"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:09 PM2024-07-02T12:09:22+5:302024-07-02T12:16:02+5:30

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.

"Today they are not there, I will be very sorry for this...", Pankaja Munde emotional before filling the application for the Vidhan Parishad! | "आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!

"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!

मुंबई : या महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंसह तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. 

पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास आता संपणार, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे. तसेच, पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते. मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभर देखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. यानंतर मी अर्ज दाखल करणार आहे.

याचबरोबर, मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार या सर्वच सदस्यांचे आभार मानते, ज्यांनी माझं नाव सुचवलं. तसेच, लोकांना प्रतिक्षा करावी लागली. मला हवंय ते करण्यापेक्षा लोकांना हवंय ते राजकारणात करायचं असतं. आता लोकांना हवंय ते झालंय, मी सर्वांचे आभार मानते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलले होते. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला जीवनात जे काही आज मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे भावुक झाल्याचे दिसून आल्या.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी? 
१) पंकजा मुंडे
२) योगेश टिळेकर
३) परिणय फुके 
४) अमित गोरखे
५) सदाभाऊ खोत

१२ जुलै रोजी मतदान
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २ जुलै आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली गेली आहे. सोबतच विदर्भातून परिणय फुके तर पुण्यातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबरोबरच महायुतीमधील मित्रपक्षांमधून सदाभाऊ खोत यांनाही भाजपानं संधी दिली आहे.

Web Title: "Today they are not there, I will be very sorry for this...", Pankaja Munde emotional before filling the application for the Vidhan Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.