आज तुरळक पाऊस; आठवडा कोरडा जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 06:11 AM2018-09-17T06:11:29+5:302018-09-17T06:12:00+5:30
जून आणि जुलै महिन्यात दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबईकडे पाठ फिरवली.
मुंबई : जून आणि जुलै महिन्यात दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबईकडे पाठ फिरवली. दरम्यान, रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात हजेरी लावत पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला. सोमवारीही मुंबई शहरासह उपनगरात पावसाची तुरळक हजेरी लागेल, मात्र आठवडा कोरडा जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
रविवारी सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत भायखळा, लालबाग, दादर, वरळी, पूर्व उपनगरात सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकीनाका, पवई, पश्चिम उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव येथे पावसाने हजेरी लावल्याने, मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला.
दरम्यान, सकाळी पडलेल्या पावसाने दुपारी मात्र विश्रांती घेतली. परिणामी, दुपारचे ऊन गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांसाठी तापदायक ठरले. त्यामुळे पाऊस पडावा, अशी अपेक्षा मुंबईकरांकडून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवारी पाऊस हजेरी लावणार असला तरी आठवडा कोरडा जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, १७ ते २० सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.