लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजच्या शनिवारी, रविवारी मुंबईत १०० टक्के लॉकडाऊन लावला जाणार असून, या काळात केवळ जीवनाश्यक वस्तूंची सेवाच सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी मुंबईकरांनी कठोर निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले. तर लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या जेवणाची तारांबळ उडू नये म्हणून हॉटेलच्या घरपोच जेवणासाठी अगोदरच ऑर्डर द्यावी लागणार आहे. दुसरीकडे शनिवारसह रविवारच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीपासून झाली असली तरी बहुतांश ठिकाणी गर्दी कायम असण्यासह काही किरकोळ दुकानेदेखील सुरू असल्याचे चित्र होते.
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्यक्षात मुंबईत सगळीकडे कठोर निर्बंध पाळले जात नाहीत. काही मोठ्या बाजारपेठ सोडल्या तर छोट्या बाजारपेठा सकाळ आणि संध्याकाळी सुरू असतात. दादरसारखी गर्दीची ठिकाणे मात्र बंद असून, इतर परिसरात दुकानाचे शटर अर्धे बंद करून व्यवहार केले जात आहेत.
दरम्यान निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सरकारने म्हटले आहे. आता सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच आहे. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला असून, याला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात? यावरच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येणार की नाही, याचे उत्तर दडलेले आहे.
* केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू
शनिवारी आणि रविवारी मुंबईत १०० टक्के लॉकडाऊन असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
-------------