मुंबई - राज्यातील राज्यसभा निवडणुकांची लगबग सुरू असून महाराष्ट्रातील उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा हात सोडून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनाही भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर, अशोक चव्हाण यांनी आज सकाळी मुंबईतील सिद्धीविनायक गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना अशोक चव्हाण यांनी पक्षांतराच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळल्याचे दिसून आले.
फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपा आणि महायुतीतील शिंदे गट असे मिळून एक ४ उमेदवारांची नावे जाहीर झाली. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या या चारही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला जिंकता येणार आहेत. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला एक जागेवर विजय मिळेल. तर, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाकडून अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले. तसेच, मी नवी सुरूवात करत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी, पत्रकाराने विरोधकांचा संदर्भ देत प्रश्न विचारला होता. त्यावर, कोण कुठे होता, यापेक्षा आज कोण कुठे आहे हे महत्त्वाचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणावर म्हणाले
तुर्तास हा प्रश्न राज्य स्तरावर आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भाने अधिवेशन बोलावलं आहे. त्यामध्ये, सभागृहात जो काही निर्णय होईल, त्यानंतर आवश्यकतेनुसार केंद्र सरकारची मदत झाल्यास, अर्थात ते काय निर्णय होतील यानंतरच हे स्पष्ट होईल, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली.