मुंबई : रुळावर आल्यानंतर अवघ्या पाचएक दिवसांत १० लाख प्रवाशांचा टप्पा पार करणारी मेट्रो रेल्वे आजच्या रविवारी पुन्हा लाखभर प्रवाशांना घेऊन धावणार आहे. विशेष म्हणजे सुट्टीचा विचार करत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने आजच्या रविवारी लहान मुलांकरिता मुंबई मेट्रोचा प्रवास मोफत ठेवला आहे. त्यामुळे रविवारच्या गर्दीत आणखीच भर पडण्याची शक्यता आहे.मागील आठवड्यातील रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले आणि पहिल्याच दिवशी मेट्रोने २३० फेऱ्या पूर्ण करीत तब्बल २ लाख प्रवासी वाहून नेले. त्यानंतर मेट्रोचा वेग कायम राहिला आणि चाकरमान्यांसह मेट्रोतून राईड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. मेट्रोतील वाढत्या प्रवाशांच्या संख्येने दिल्ली मेट्रोलाही मागे टाकले. घाटकोपर ते वर्सोवा असा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. वर्सोव्याहून पुढे पिकनिक स्पॉटला जाणाऱ्या अनेक प्रवाशांचा या गर्दीत समावेश होता. दरम्यान, शनिवारी रात्री मेट्रो ठप्प झाली असली तरी रविवारच्या प्रवासादरम्यान मुंबईकर प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने केला आहे. त्यामुळे आजच्या रविवारच्या मेट्रो प्रवासाची रंगत आणखीच वाढणार असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
आजही होणार मेट्रो हाऊसफुल
By admin | Published: June 15, 2014 1:36 AM