Join us

आजपासून फास्टॅगद्वारे मिळणार मासिक पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबईच्या ५ टोल नाक्यावर मासिक पासधारकांना २७ एप्रिलपासून फास्टॅगमध्येच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबईच्या ५ टोल नाक्यावर मासिक पासधारकांना २७ एप्रिलपासून फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा उपलब्ध होणार असून, साधारणपणे २२ हजार ते २५ हजार वाहनधारकांना या सुविधेचा फायदा होईल.

सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले की, पथकर नाक्यावर प्रत्यक्ष जाऊन रोख रक्कम देऊन मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीत बदल करून त्या ऐवजी बँकेस ऑनलाइन पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगद्वारे मासिक पास घेता येईल. फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिकामधून प्रवास करता येईल. वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल. यापुढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल. ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी फास्टॅग घेणे आवश्यक आहे.

महामंडळ, आयसीआयसीआय बँक व एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्यानुसार ही सुविधा देण्यात येईल. वाहनधारकासाठी ऑनलाइन २ पर्याय उपलब्ध आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ हा आहे. दुसऱ्या पर्यायाद्वारे आयसीआयसीआय बँक फास्टॅग लॉगिनद्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येईल. मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांक संबंधित पथकर नाक्यावर ३ दिवसांच्या आत जाऊन त्यानुसार मासिक पास कार्यान्वित करून घ्यावा लागेल. मुदतीत कार्यान्वित न केल्यास पास आपोआप रद्द होऊन तेवढी रक्कम वाहनधारकाच्या खात्यात परत जमा होईल.वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या पथकर नाक्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यामुळे मुंबई पथकर नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली.

* लवकरच सर्व मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा हाेणार कार्यान्वित

मुंबई प्रवेश द्वारावरील ४ पथकर नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे. राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजूच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा २६ जानेवारीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानुसार वाशी, ऐरोली येथील पथकर नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरित करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित होईल.

- कमलाकर फंड,

मुख्य महाव्यवस्थापक, पथकर प्रशासन विभाग

...........................................................