लोकमत लेखन स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण
By admin | Published: January 2, 2015 10:42 PM2015-01-02T22:42:26+5:302015-01-02T22:42:26+5:30
लोकमतच्या रायगड (अलिबाग) कार्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित रायगड जिल्हास्तरीय लेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अलिबाग : लोकमतच्या रायगड (अलिबाग) कार्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित रायगड जिल्हास्तरीय लेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘असा हवा माझा रायगड’, ‘वाळीत प्रकरणांची वाळवी घालवणार कशी’ आणि ‘स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ असे तीन विषय स्पर्धेकरिता देण्यात आले होते.
जिल्ह्यातून एकूण १०७ लेख विद्यार्थी गट, प्राध्यापक/शिक्षक गट आणि खुला गट अशा तीन गटांतून प्राप्त झाले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता जयमाला गार्डन्स, जा.र.ह.कन्याशाळेसमोर, अलिबाग येथे आयोजित विशेष सोहळ्यात होणार असून, स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारितोषिक वितरण सोहळ्यास रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जेएसडब्ल्यू स्टील लि.चे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अगरवाल, लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहा. उपाध्यक्ष विजय शुक्ला आणि लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर हे उपस्थित राहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
अलिबाग : लोकमत रायगड कार्यालयाच्या वर्धापनदिनी शनिवारी अलिबाग येथील कार्यालयात सत्यनारायण पूजा होणार आहे. तर सायंकाळी गायिका उत्तरा केळकर यांच्या ‘सलामआशा’ या कार्यक्रमाचे आयोजन जयमाला गार्डन्स येथे करण्यात आले आहे. सोहळ्यानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा आदी समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते.
अलिबाग : रक्तदान करण्यासाठी समाजामध्ये जागरुकता येणे गरजेचे आहे. एका व्यक्तीने रक्तदान केल्याने चार जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक जागरुक नागरिकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे, असे विचार विश्र्वरुपचे कार्यकारी संपादक सुयोग आंग्रे यांनी मांडले.
लोकमत रायगड कार्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अलिबागच्या सरकारी रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कार्यक्रमात ते बोलत होते.
सुयोग आंग्रे यांच्यासह त्यांचे सहकारी सचिन पावशे, विजय मयेकर, वैभव भाटकर, गणेश रेळकर यांच्यासह पत्रकार जयप्रकाश पवार, जगदीश घरत, गणेश दाते, अभिषेक करकरे, प्रलय पाटील, समीर राऊळ, प्रथमेश जंगम यांनी रक्तदान केले.