Join us

आज वेतन करार लागू न झाल्यास बेस्टचा संप अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:07 AM

प्रशासनाला चार वाजेपर्यंत मुदत : वडाळा आगारात धरणे आंदोलन

मुंबई : बेस्ट कामगारांना नवीन वेतन करार लागू करण्यासाठी कामगार संघटनांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी वडाळा येथील बस आगाराबाहेर सोमवारी धरणे आंदोलनही केले. मात्र मंगळवारपर्यंत कराराबाबत निर्णय न झाल्यास संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे बेस्ट कामगारांच्या कृती समितीने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत तीन वेळा संप पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी कृती समितीने सर्व बस आगारांमध्ये मतदान घेतले. यामध्ये ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला. मात्र बेस्ट प्रशासनाने अन्य काही संघटनांना चर्चेसाठी बोलावले होते; तसेच मंगळवारपर्यंत नवीन वेतन करार होईल, असे शिवसेनेने जाहीर केल्यामुळे कृती समितीने संप पुढे ढकलला.

सोमवारी स. ११ वाजल्यापासून कृती समितीच्या नेतृत्वाखाली काही कामगार वडाळा बस आगारात धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. हे आंदोलन आज मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत बेस्ट प्रशासनाने नवीन वेतन करार व कामगारांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास सायंकाळी चार वाजता कृती समिती कामगारांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.९८ टक्के कामगार संपाच्या बाजूनेबेस्ट उपक्रमातील १७ हजार ९२५ कामगारांनी मतदान केले. यापैकी १७ हजार ४९७ कामगारांनी संप करावा, असे मत दिले आहे. तर ३६८ कामगारांना संप मान्य नाही. तसेच ६० मते अवैध ठरली आहेत. १,७३१ कामगारांनी आॅनलाइन मतदान केले. यापैकी १,५८६ कामगारांनी संपाला कौल दिला आहे.शिवसेनेची प्रतिष्ठा पणालाजानेवारी महिन्यात झालेल्या संपात शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनाही उतरली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी संपातून बाहेर पडत शिवसेना नेत्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. परंतु, शिवसेनेचा पाठिंबा नसतानाही बेस्ट कामगारांचा संप नऊ दिवस चालला होता. यामुळे शिवसेनेची मोठी नाचक्की झाली होती. या वेळेस कृती समितीने संपाची हाक दिल्यामुळे शिवसेना आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. राव यांना श्रेय घेता येऊ नये, म्हणून करार मंगळवारपर्यंत होणार, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात उद्या करार होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :बेस्ट