राजकीय वर्चस्वाचा आज फैसला

By admin | Published: November 1, 2015 10:45 PM2015-11-01T22:45:19+5:302015-11-02T00:30:38+5:30

मंडणगड, रत्नागिरी शहर : मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त

Today's decision of state government | राजकीय वर्चस्वाचा आज फैसला

राजकीय वर्चस्वाचा आज फैसला

Next

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व प्रभाग ४ मधील एकूण चार जागांसाठी आज (रविवार) शांततेत ४९.५० टक्के मतदान झाले. या निवडणूक रिंगणात असलेल्या एका अपक्षासह एकूण १५ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे. उद्या (सोमवारी) मतमोजणी होणार असून, राष्ट्रवादी बाजी मारणार की शिवसेना राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागा आपल्याकडे खेचणार, याबाबत उत्सुकता आहे. मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी पालिकेतील राष्ट्रवादीचे चार सदस्य अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. ही पोटनिवडणूक जाहीर होताच रत्नागिरीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या. शिवसेनेत असलेले नगरसेवक उमेश शेट्ये यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शहरातील शिवसेनेच्या एकहाती राजकारणाला काहीसा छेद गेला. उमेश शेट्ये राष्ट्रवादीत गेल्याने सेनेपुुढे त्यांनी आव्हान निर्माण केले.
शेट्ये यांना आपले अस्तित्व दाखवून द्यायचे आहे तर सेनेलाही रत्नागिरीत आपली ताकद कायम राखायची आहे. त्यामुुळे गेल्या महिनाभरातील प्रचाराची जी व्यूहरचना होती ती उमेश शेट्ये यांना कोंडीत पकडणारी होती. त्यामुळे सेनेची ही व्यूहरचना मतदारांच्या पचनी पडली की, उमेश शेट्ये यांच्यावर त्यांचा आजही विश्वास आहे, यावर उद्याच्या मतमोजणीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. या निवडणुकीत प्रभाग २ (ब) मधून सेनेच्या ऋतुजा देसाई, राष्ट्रवादीच्या कोसल्या शेट्ये, भाजपच्या नीलिमा शेलार, तर प्रभाग २ (ड) मधून भाजपच्या सुहासिनी भोळे, सेनेच्या पूर्वा सुर्वे व राष्ट्रवादीच्या शिल्पा राहुल सुर्वे या निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग ४ (अ) मधून राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये, सेनेचे तन्वीर जमादार, भाजपचे मनोज पाटणकर, मनसेचे सचिन शिंदे व अपक्ष आशिष केळकर तसेच प्रभाग ४ (ड) मधून सेनेच्या दिशा साळवी, राष्ट्रवादीच्या रुबिना मालवणकर, भाजपच्या नीशा आलीम व मनसेच्या रचना आंबेलकर या निवडणूक रिंगणात आहेत.
सकाळी ७.३० वाजल्यापासून दोन्ही प्रभागातील एकूण १३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू झाले. प्रभाग २ मध्ये ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासात ७.०२ टक्के अर्थात ६०५ एवढे मतदान झाले. ९.३० ते ११.३० या दोन तासात एकूण १७.०१३ टक्के अर्थात १४६५ मतदान झाले. सकाळ ते दुपारी दीड वाजेपर्यंत प्रभाग २ मध्ये २७.२७ टक्के म्हणजेच २३४९ एवढे मतदान झाले. प्रभाग ४ मध्ये सकाळी ७.३० ते ९.३० वाजता या दोन तासात ९.०४० टक्के म्हणजेच ७१३ मतदान झाले. ९.३० ते ११.३० या वेळात १९.८८१ टक्के म्हणजेच १५६८ मतदान झाले. सायंकाळपर्यंत प्रभाग २मध्ये ४६, तर ४मध्ये ५३ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)
 

कार्यकर्त्यांचा आटापिटा
शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील या अटीतटीच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्रांच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याच उमेदवाराला मत कसे मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांचा आटापिटा दिसून येत होता. न आलेले मतदार कोणते, याची यादी तपासून त्यांच्या घरी जाऊन मतदानासाठी दस्तक दिली जात होती.
 

त्यांना बिर्याणी, आमचा उपवास?
तळमळीने पक्षाचे काम करणाऱ्या, मतदारांच्या घरी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यथा वेगळीच होती. एका पक्षाच्या शहर अध्यक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या भोजनाची चोख व्यवस्था केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांना बिर्याणी चाखता आली, तर आम्हाला मरेस्तोवर काम करून उपवासच घडल्याची प्रतिक्रिया एका पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याने व्यक्त केली.
 

मंडणगडात मतदारांचे उत्साही मतदान
मंडणगड : मंडणगड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. २३३९पैकी १९८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी टक्केवारी ८४.५५ टक्के एवढी होती. एकूण ५४ मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
उद्या सोमवारी मतमोजणी होणार आहे़ रविवारी सतरा मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व जिल्हा परिषदेच्या तालुका स्कूल, मंडणगड व कोंझर यांचा समावेश होता.
प्रभाग १मध्ये ९० टक्के मतदान झाले. प्रभाग २मध्ये ८२.५२ टक्के मतदान झाले. एकूण १०३पैकी ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक ३मध्ये ९२.६२ टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक ४मध्ये ८०.४३ टक्के मतदान झाले. प्रभाग ५मध्ये ८८.८१ टक्के मतदान झाले. १६१ मतदारांपैकी १४३ मतदारांनी मतदान केले. प्रभाग ६मध्ये ८३.२४ टक्के मतदान झाले. १८५ पैकी १५४ मतदारांनी मतदान केले. प्रभाग ७मध्ये ७५ टक्के मतदान झाले. २२८पैकी १७७ मतदारांनी मतदान केले. प्रभाग ८ मध्ये ७८.४१ टक्के तर प्रभाग ९ मध्ये ८९.१२ टक्के मतदान झाले.
प्रभाग १० मध्ये ७७.६२ टक्के मतदान झाले. २१९ मतदारांपैकी १७० मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्ऱ ११ मध्ये ९२.६८ टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. १२मध्ये ८४.५३ टक्के मतदान झाले. प्रभाग क्ऱ १३मध्ये ९४.७३ टक्के मतदान झाले. प्रभाग १४मध्ये ९१.२६ टक्के मतदान झाले. प्रभाग १५मध्ये ८७.३७ टक्के मतदान झाले. १०३पैकी ९० मतदारांनी मतदान केले. प्रभाग १६मध्ये ८८.४२ टक्के मतदान झाले, तर प्रभाग क्ऱ १७मध्ये ७८.२० टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Today's decision of state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.