आज सेना भाजपाची ठाण्यात महत्वाची बैठक
By admin | Published: May 25, 2015 10:49 PM2015-05-25T22:49:16+5:302015-05-25T22:49:16+5:30
सेना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी शासकीय विश्राम धामावर होणार आहे. या नंतर शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
ठाणे : वसई -विरार महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय सोमवारी वर्षावर झालेल्या बैठकीत जवळ-जवळ निश्चित झाला असून त्याला अंतिम रुप देण्यासाठी सेना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी शासकीय विश्राम धामावर होणार आहे. या नंतर शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे पत्रकार परिषद घेणार आहेत.
या युतीवरून भाजपामध्ये बरेच उलट सुलट प्रवाद निर्माण झाले होते. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत कोणाशीही युती, आघाडी होणार नाही असे कोल्हापूर येथे जाहीर केल्यामुळे व मुख्यमंत्र्यांनीही त्यांची री ओढल्यामुळे युती होणार की नाही अशा वातावरणात आजची ही बैठक वर्षावर न होता ठाण्याच्या विश्रामगृहावर झाली. तिला पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे तसेच खासदार कपिल पाटील आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व भाजपाचे संघटन मंत्री देशमुख, तसेच वसईचे माजी आमदार विवेक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत ही युती होणारच असे ठरले.
कोणी किती जाग लढवायच्या आणि कुठल्या जागा लढवायच्या याबद्दलची अंतिम निश्चिती मंगळवारच्या बैठकीत होणार असून तिला उपरोक्त नेते आणि अन्य काही निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या बैठकीची निश्चिती झाल्यानंतर शिवसेनेची नेते मंडळी शिवसेनाभवनावर गेली आणि आतापर्यंत इच्छुकांच्या घेतलेल्या मुलाखती तसेच काही वॉर्डातील संभाव्य उमेदवारांची निश्चिती आदी बाबींवर तिथे त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या निवडणुकीतील युती व जागा वाटप याच्या चर्चेत शक्यतो स्थानिक नेत्यांनाच सहभागी करून घ्यावे प्रदेश अथवा विभागीय पातळीवरील नेत्यांनी सहभागी होऊ नये अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. तसेच धोरण शिवसेनेनेही अनुसरले आहे.
(विशेष प्रतिनिधी)