Join us

लोकमतच्या दुष्काळदाहकता छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन

By admin | Published: May 13, 2016 2:36 AM

नदी, नाले, विहिरी जलसमृद्ध असतात, तेव्हा ते आपल्या सौंदर्याची नजाकत सांगतात. तेच जलसाठे कोरडे पडतात, तेव्हा ते दुष्काळाची भीषणता उजागर करतात.

ठाणे : नदी, नाले, विहिरी जलसमृद्ध असतात, तेव्हा ते आपल्या सौंदर्याची नजाकत सांगतात. तेच जलसाठे कोरडे पडतात, तेव्हा ते दुष्काळाची भीषणता उजागर करतात. या वर्षी चांद्यापासून बांद्यापर्यंत अशाच दुष्काळाने कहर केला. त्याचे चटके मानवी मनासह साऱ्या निसर्गाने सोसले. हा भीषण दुष्काळ महाराष्ट्रभरातील ‘लोकमत’च्या छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केला. राज्यभरातील ही ‘दुष्काळदाहकता’ ठाण्यातील कापूरबावडीतील कलाभवनात पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून लोकमतच्या संगतीने ‘जलमैत्री’चे घट्ट नाते विणावे, हा या छायाचित्र प्रदर्शनाचा हेतू आहे. तो सार्थ ठरवण्यासाठी आपण नेहमीच ‘लोकमत’च्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असता, याची आम्हाला जाणीव आहे. या प्रदर्शनाला उपस्थित राहून आपले स्नेहाचे, प्रेमाचे, सदिच्छांचे नाते आणखी घट्ट व्हावे, ही यामागील लोकमतची भावना आहे. हे प्रदर्शन तानसा गॅलरी, कलाभवन, कापूरबावडी, ठाणे (प.) येथे शुक्रवार १३ मे ते रविवार १५ मे या कालावधीत सकाळी ९.३० ते सायं. ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाच्या शुभारंभास पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संजय केळकर, महापौर संजय मोरे, टीपटॉप प्लाझाचे मालक रोहितभाई शहा, सुरभी अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक यू.व्ही. नायर, सारथी अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक अमोल धर्मे, युनिक पब्लिसिटीचे संचालक अविनाश मिश्रा आदी उपस्थित राहणार आहेत.