उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस
By admin | Published: February 3, 2017 01:20 AM2017-02-03T01:20:30+5:302017-02-03T01:20:30+5:30
तब्बल पंचवीस वर्षे एकत्र नांदलेल्या भाजपा-शिवसेनेचा काडीमोड झाला आणि प्रभागात कित्येक वर्षे चपला झिजवणाऱ्या कार्यकर्त्यासह सतरंजी उचलणाऱ्या
मुंंबई : तब्बल पंचवीस वर्षे एकत्र नांदलेल्या भाजपा-शिवसेनेचा काडीमोड झाला आणि प्रभागात कित्येक वर्षे चपला झिजवणाऱ्या कार्यकर्त्यासह सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यालाही उमेदवारीचे डोहाळे लागले. यातच उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतराने वेग पकडला आणि याच पक्षांतरात कार्यकर्त्यांची फरफट होऊ
लागली.
मात्र तरीही आता आलेली संधी दवडायची नाही, असाच काहीसा निश्चय ‘अभी नही तो कभी नही...’ म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी केला आहे. उमेदवारी दाखल करण्याचा आजचा (शुक्रवार) शेवटचा दिवस आहे. शुक्रवारनंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणातले चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मते मिळवण्यासाठी उमेदवारांच्या वाऱ्या घरोघरी सुरू होणार आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना हा अर्ज ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्या-त्या विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. तसेच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज सायंकाळी ४ वाजेपर्यंतच भरता येणार आहेत. सायंकाळी ४ नंतर भरलेला अर्ज डाऊनलोड होणार नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात तसेच मध्यवर्ती निवडणूक केंद्रामध्ये ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत.
या कक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणींबाबत हा कक्ष उमेदवारांना मार्गदर्शन करत आहे. आॅनलाइन व आॅफलाइन या दोन्हीही प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना हा कक्ष मार्गदर्शन करत आहे. उमेदवारांनी या ‘मदत कक्षा’चा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांना विशेष प्रशिक्षण
निवडणुकीच्या कामाकरिता नेमण्यात आलेल्या शिक्षकांना ३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे काम या शिक्षकांना आले असल्याने, ३ फेब्रुवारी रोजी त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. तथापि, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार या सर्व शिक्षकांकरिता १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण करी रोड येथील ना.म. जोशी मार्गावरील महापालिकेच्या शाळेत देण्यात येणार आहे, असे उपायुक्त बापू पवार यांनी सांगितले.