मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठी रविवारी सकाळी १० वाजता म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येईल. मुंबईच्या या वर्षीच्या आॅनलाइन लॉटरीकरिता १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणाला घर मिळणार, हे आज जाहीर होणार असल्याने लॉटरीसाठी वाट बघणाऱ्या मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. मात्र, घरबसल्या हे प्रक्षेपण पाहण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
लॉटरी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तयारीचेदेखील थेट प्रक्षेपण सकाळी साडेसात वाजल्यापासून पाहता येईल. संकेतस्थळावर वेबकास्टिंगद्वारेच करण्यात येणार आहे. म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला असून, येथे व्यासपीठावर होणाºया आॅनलाइन लॉटरीचे प्रक्षेपण पाहता येईल. त्याकरिता म्हाडा भवनाच्या प्रांगणातील मंडपात पाच मोठ्या आकाराचे एलईडी स्क्रीन्सदेखील लावण्यात आले आहेत.
स्वस्त आणि परवडणाºया घरांसाठी अनेकजण म्हाडाच्या लॉटरीची आतूरतेने वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे यंदा जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीला नेहमीप्रमाणेच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. १ हजार ३८४ घरांसाठी तब्बल १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. हजारोंच्या संख्येत असलेल्या घरांसाठी लाखोंनी अर्ज आल्याने लॉटरीत घर मिळेल का, असा प्रश्न अनेक मुंबईकरांसमोर आहे. त्याचे उत्तर त्यांना आजच्या लॉटरीच्या निकाला मिळेल.यंदाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सायन प्रतीक्षानगर, मानखुर्द, चांदिवली, पवई, मागाठाणे, बोरीवली येथे सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटाकरिता अँटॉप हिल वडाळा, प्रतीक्षानगर - सायन, पीएमजीपी - मानखुर्द, गव्हाणपाडा - मुलुंड, सिद्धार्थनगर - गोरेगाव, चांदिवली - पवई, कन्नमवारनगर - विक्रोळी येथे घरे उपलब्ध आहेत, तर मध्यम उत्पन्न गटाकरिता महावीरनगर - कांदिवली, आम्रपाली टागोरनगर, घाटकोपर, वडाळा, माटुंगा, दादर, शैलेंद्रनगर दहिसर, मागाठाणे बोरीवली, मालवणी मालाड, सिद्धार्थनगर, उन्नतनगर - गोरेगाव व चारकोप येथे घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उच्च उत्पन्न गटाकरिता पंतनगर - घाटकोपर, सहकारनगर - चेंबूर, ग्रॅण्ट रोड, वडाळा, सायन, माटुंगा, बोरीवली, कांदिवली, तुंगा - पवई, लोअर परेल, चारकोप येथे घरे उपलब्ध आहेत.अर्जदारांची यादी संध्याकाळी होणार जाहीरम्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांची उत्सुकता लक्षात घेता, म्हाडा प्रांगणात सुरक्षेकरिता अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षक, तसेच येणाºया अर्जदारांकरिता चहा-पाण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. अर्जदारांनी सोडत कार्यक्रमात सहभाग घेण्याकरिता स्वत:च्या अर्जाची पावती आणणे बंधनकारक राहील. सोडतीमधील विजेत्या, तसेच प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर १६ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्याचप्रमाणे, ही माहिती संकेतस्थळावर अपलोड केल्याबाबतचा संदेश सर्व अर्जदारांना भ्रमणध्वनीवरून पाठविला जाणार आहे.