मुंबई : उष्णतेच्या लाटेने राज्य होरपळत असतानाच, दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान मात्र ३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, वाढत्या उकाड्यासह घामाने मुंबईकर हैराण झाले आहेत. हवामानात हे बदल नोंदविण्यात येत असतानाच, सोमवारी म्हणजे मतदानाच्या दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येईल, तसेच मुंबईसह आसपाच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात उष्णतेची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सूर्य आग ओकत असून, विदर्भात कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर सरकला आहे. येथे यापूर्वी झालेल्या मतदानावेळी कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या घरात नोंदविण्यात आला होता. परिणामी, दुपारवेळी मतदार कमी संख्येने मतदानास बाहेर पडल्याचे चित्र होते. आता मुंबईत सोमवारी मतदान होणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येईल आणि मुंबईसह आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा काहीसा सुसह्य होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हवामानाचा मतदानावर होणार का परिणाम?हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी हवामान ढगाळ राहिले, तरी येथील दुपार तप्त नसेल. परिणामी, मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडतील. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि सूर्य आग ओकत असेल, तर दुपारी मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या मतदारांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता हवामानातील बदलाचा मतदानावर नेमका काय परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.