Join us

पेट्रोलपंप चालकांचे आजपासून देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 4:43 AM

शासनस्तरावर असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, म्हणून देशातील पेट्रोलपंप चालक उद्या गुरूवारपासून देशव्यापी आंदोलन पुकारत आहेत.

मुंबई : शासनस्तरावर असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, म्हणून देशातील पेट्रोलपंप चालक उद्या गुरूवारपासून देशव्यापी आंदोलन पुकारत आहेत. या आंदोलनाची सुरूवात म्हणून गुरूवारी व शुक्रवारी पेट्रोलपंप चालक पेट्रोलची खरेदी थांबवणार असल्याचे फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.लोध म्हणाले की, तेल कंपन्यांकडे वारंवार मागण्या करूनही पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शासनही पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांबाबत उदासीन आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ४ नोव्हेंबरला तेल कंपन्यांसोबत मुंबईत वाटाघाटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यात कोणताही तोडगा निघाला नाही, तर ५ नोव्हेंबरपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये पेट्रोल व डिझेल विक्री करण्याचा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे. त्यानंतरही ठोस तोडगा न निघाल्यास ६ नोव्हेंबरपासून सर्व पेट्रोलपंप चालक रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी सर्वच व्यवहार बंद ठेवतील, असा इशारा लोध यांनी दिला. पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने केलेल्या मागणीनुसार, अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणींबाबत शासनाने एक समिती तयार केली होती. या समितीने तीन वर्षांपूर्वी शासन दरबारी अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर १ रूपया ४८ पैसे, तर पेट्रोलला प्रति लीटर २ रुपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते. याउलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च, नियमांचे पालन, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे हा व्यवसाय चालविणे कठीण बनले आहे. परिणामी कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पेट्रोलपंप चालक आपल्या खर्चात बचत म्हणून रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पंपावरील सर्व व्यवहार बंद ठेवणार आहेत़ (प्रतिनिधी)