Join us

आज संघटित, असंघटित कामगार संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 6:54 AM

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगार संघटनांनी मंगळवारी, १ मे रोजी आझाद मैदानात एल्गार मोर्चाची हाक दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगार संघटनांनी मंगळवारी, १ मे रोजी आझाद मैदानात एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात संघटित आणि असंघटित कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले आहे.अहिर म्हणाले की, सरकार कामगार हितकारक कायदे मोडीत काढून, कामगार चळवळ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिकागोतील कामगारांच्या त्यागाचे स्मरण करताना सर्व कामगार संघटनांनी आपआपले तत्त्व बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल.कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, मोर्चामध्ये संघटित व असंघटित कामगारांच्या विविध संघटना सामील होणार आहेत. मात्र भाजपाप्रणीत भारतीय मजदूर संघाने या मोर्चातून अंग काढून घेतले आहे. तरीही या एल्गार मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हजर राहून कामगारांना सामाजिक सुरक्षेचे आश्वासन द्यावे.तर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांना सत्तेत राहून विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. म्हणूनच कामगार सेनेचे हजारो कामगार या एल्गार मोर्चात शक्तिप्रदर्शन करतील.