अस्तित्वासाठी तंबाखू विक्रेत्यांचा आज मोर्चा, रोजगार वाचवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:44 AM2017-11-06T04:44:59+5:302017-11-06T04:45:34+5:30
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-या दुकानांत चॉकलेट, बिस्किट्स, चिप्स, कोल्ड्रिंक अशा प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याची सूचना केंद्र शासनाने राज्य सरकारला केली आहे.
मुंबई : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-या दुकानांत चॉकलेट, बिस्किट्स, चिप्स, कोल्ड्रिंक अशा प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याची सूचना केंद्र शासनाने राज्य सरकारला केली आहे. मात्र या सूचनेमुळे २० लाखांहून अधिक रोजगारांवर गदा येण्याची भीती मुंबई विडी-तंबाखू व्यापारी संघाचे अध्यक्ष शशांक राव यांनी व्यक्त केली आहे. शिवाय विक्रेत्यांच्या अस्तित्वासाठी सोमवारी आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.
तंबाखूजन्य वस्तूसह खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक साहित्य विक्रीसाठीचा परवाना विक्रेत्यांकडे असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिष्टे यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्राने केलेल्या सूचनेचा विचार करून राज्य शासनाने कायदा केल्यास सर्व विक्रेते उद्ध्वस्त होतील. बहुतेक ग्रामीण भागात आजही एका गावात एकच दुकान असून तंबाखू विक्रीच्या दुकानांत खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घातल्यास विक्रेत्यांचे नुकसान व ग्राहकांची गैरसोय होईल. मुळात कुटुंबांचा उदरनिर्वाह चालावा, म्हणून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºया विक्रेत्यांना शासनानेच २००३ साली खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी दिली होती. मात्र बंदी घालून सरकार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवत असल्याचा आरोप हेगिष्टे यांनी केला आहे. सरसकट सर्वच दुकानांवर बंदीचा कायदा केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला आहे.