रिलायन्सवर वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:27 AM2018-06-29T03:27:09+5:302018-06-29T03:27:11+5:30
लायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबई उपनगरातील वीज कंपनीवर स्थायी व कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी, २९ जून रोजी धडक मोर्चाची हाक दिली आहे.
मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबई उपनगरातील वीज कंपनीवर स्थायी व कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी, २९ जून रोजी धडक मोर्चाची हाक दिली आहे. ३० जून २०१८ रोजी स्थायी व कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढ व सोयी-सवलतींच्या कराराची मुदत संपत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागणीपत्राचा मसुदा तयार करण्याची मागणी करत मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने धडक मोर्चाची हाक दिली आहे.
युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले की, ७ ते २० जूनदरम्यान रिलायन्स इन्फ्रामधील विविध खात्यांतील कामगारांच्या सभांमधून त्यांचे विचार, सूचना ऐकून संघटनेने मागणीपत्राचा मसुदा तयार केला आहे.
स्थायी व कंत्राटी कामगारांच्या मागणीपत्राच्या मसुद्याला २७ जून रोजी झालेल्या सर्वसामान्य सभेत मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानुसार २९ जून रोजी व्यवस्थापनाला मागणीपत्राचा मसुदा सादर केला जाईल.
बोरीवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कल येथून कामगारांचा मोर्चा ढोल-ताशांच्या गजरात निघेल. शेकडो कामगार येथील देवीदास लेनमध्ये असलेल्या व्यवस्थापनाच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडक देतील.
त्यानंतर तत्काळ मागणीपत्रावर चर्चा करून तातडीने कामगार करार करण्याचे साकडे व्यवस्थापनाला घालणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.