प्लॅस्टिक बंदीच्या जागृतीसाठी आज रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 04:49 AM2018-05-01T04:49:06+5:302018-05-01T04:49:06+5:30
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर २३ जूनपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होत आहे. मात्र, प्लॅस्टिक बंदीबाबत बरेच गैरसमज असल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर २३ जूनपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होत आहे. मात्र, प्लॅस्टिक बंदीबाबत बरेच गैरसमज असल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कारवाई सुरू करण्यापूर्वी जनप्रबोधनासाठी महापालिकेमार्फत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तीन दिवस रथयात्रा काढण्यात येणार आहे.
कोणते प्लॅस्टिक वापरू नये, घरातील प्लॅस्टिकचे सामान कुठे टाकावे, याबाबत नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगर व शहर भागात प्लॅस्टिकच्या वापराविरोधात १ ते ३ मेपर्यंत रथयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये कोणते प्लॅस्टिक वापरू नये, कशावर बंदी आहे आणि प्लॅस्टिक वस्तू व पिशव्यांना पर्याय काय, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
महापालिका आणि स्थानिक एएलएमच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वस्तू आणि त्यांच्या उत्पादनाचा प्रसार करण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढील दोन महिने चालविण्यात येणार आहे. तसेच माहितीपट, चित्रपटगृहात जाहिराती आणि पथनाट्याच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईत शंभर ठिकाणी बॉटल क्रशिंग मशीन बसविण्यात येणार आहे.
प्लॅस्टिक पिशव्या, कटलरी, थर्माकोल आणि सजावटीच्या प्लॅस्टिक सामानांवर बंदी घालण्यात आली आहे.
सध्या घराघरातील प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी पालिकेच्या ७४ मंडईत व्यवस्था करण्यात आली आहे. तर उर्वरित मंडईमध्ये आणखी ६८ डबे बसविण्यात येणार आहेत.
प्लॅस्टिकचा वापर करणाºया नागरिक, उत्पादक व विक्रेता यांच्यावर २३ जूननंतर कारवाईला सुरुवात होणार आहे.
मुंबईत पाचशे मि.ली.च्या ३८ लाख तर पाचशे मि.ली.पेक्षा कमी असलेल्या २५ लाख प्लॅस्टिक बाटल्या आहेत. प्लॅस्टिक कॅरी बॅग आणि प्लास्टिकच्या वस्तू बनविणारे ४५५ उत्पादक आहेत. महापालिका मुख्यालय, गेटवे आॅफ इंडिया, सीएसएमटी, फोर्ट, नरिमन पॉइंट या ठिकाणी पाचशे बॉटल क्रशिंग मशीन बसविण्यात येणार आहेत.
प्लॅस्टिकचा वापर करणाºयाला पहिल्या वेळेस पाच हजार, दुसºया वेळेस १५ हजार, तिसºया वेळेला २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांची जेल होणार आहे.