मुंबई - पक्षात झालेली बंडाळी, त्यामुळे गमवावी लागलेली सत्तांतर या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत देत आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी बंड करत पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच भाजपावरही टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे रुदाली अर्थात सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम होता, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
उद्वव ठाकरेंची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, आजची उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम म्हणजे रुदाली म्हणतात तो आहे. पेपर आपला, प्रवक्ता आपला, शाई आपली, बाकी सगळं ओके आहे, अशा प्रकारची ही मुलाखत आहे.
या मुलाखतीत जो राजा आपलं राज्य गमावतो, त्यानंतर तो आपल्या मनातील वेदना व्यक्त करताना स्वत:लाच स्वत:काही म्हणतो, अशा प्रकारची ही मुलाखत आहे. जर यामध्ये भाजपाचा उल्लेख नसता तर आम्ही प्रतिक्रियाही दिली नसती, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्व हे भाजपामुळेच आहे. ते जेव्हा हे आमच्यासोबत युतीमध्ये होते तेव्हाही आमच्यावर टीका करायचे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, तेव्हाही त्यांनी आमच्यावर टीका केली. मुख्यमंत्री बनले तेव्हाही त्यांनी भाजपावर टीका केली. तसेच आता त्यांच्याच लोकांनी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केले, तेव्हाही ते आमच्यावर टीका करत आहेत, असा चिमटा आशिष शेलार यांनी काढला.