आज शिक्षकांचे राज्यव्यापी धरणे; जुन्या पेन्शन, सातव्या वेतन आयोगाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:00 AM2018-02-17T02:00:53+5:302018-02-17T02:01:00+5:30
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली शासनाविरोधात शनिवारी, १७ फेब्रुवारीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत.
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली शासनाविरोधात शनिवारी, १७ फेब्रुवारीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत.
शिक्षक परिषदेचे मुंबईचे विभागाचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी सांगितले की, जुन्या पेन्शन योजनेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यात केंद्र शासकीय कर्मचाºयांप्रमाणे १ जानेवारी २०१६पासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग तातडीने सुरू करण्याची प्रमुख मागणी आहे. याच मागण्यांसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात येईल. राज्याचे अध्यक्ष वेणुनाथ कडू नगरमध्ये, तर सरकार्यवाह नरेंद्र वातकर अमरावतीमधील आंदोलनात सहभागी होतील. मुंबईतील वांद्रे व फोर्ट येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयांवरही येथील पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देतील.
आंदोलनाला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या शासकीय कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होतील. राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना हक्काची कुटुंब निवृत्ती योजना काढून नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. जुन्या आणि नवीन कर्मचाºयांत भेद केला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला. इतर संघटना तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित शाळांमधील शिक्षक आंदोलनता मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा दावा बोरनारे यांनी केला आहे.