वर्षावर आज होणारी युतीची चर्चा धोक्यात
By admin | Published: May 24, 2015 11:07 PM2015-05-24T23:07:36+5:302015-05-24T23:07:36+5:30
वसई -विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या युतीचा तपशील ठरविण्याकरीता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सोमवारी
ठाणे : वसई -विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या युतीचा तपशील ठरविण्याकरीता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सोमवारी होणार असलेली भाजपा-शिवसेना नेत्यांची बैठक भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या यापुढे कोणत्याही निवडणुकीत कोणाशीही युती अथवा आघाडी &होणे नाही या कोल्हापुरी डरकाळीमुळे धोक्यात आली आहे.
ही युती होईल असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले होते. त्याला महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला होता. त्यानंतर या दोनही पक्षाच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांची प्राथमिक बैठकही गेल्या आठवड्यात झाली होती. त्यानुसार या युतीचा अंतिम तपशील ठरविण्यासाठी ही बैठक होणार होती. जिल्हास्तरीय नेत्यांच्या बैठकीत या निवडणुकीत किमान ५० जागा मिळव्यात अशी मागणी भाजपने केली होती. गेल्या महापालिका निवडणुकीत तुमचा एकही नगरसेवक निवडून आलेला नसताना एकदम ५० जागा कोणत्या भरवशावर मागता आहात? या सेनेच्या प्रश्नावर या महापालिका क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या खासदाराला पडलेल्या भरघोस मतांचा हवाला भाजपाच्या नेत्यांनी दिला होता. परंतु सेनेने जास्तीत जास्त २० ते २५ जागा देण्याची तयारी ठेवली होती. ती मान्य न झाल्यास स्वबळावर सर्व जागा लढविण्याची सज्जता सेनेने करून ठेवली आहे. अशा स्थितीत आता युतीच धोक्यात आल्यामुळे सगळे चित्र बदलून जाणार आहे. युती नकोच, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. तर या महापालिकेत चंचू प्रवेश होण्यासाठी सेनेच्या कुबड्या हव्यात असे भाजपाला वाटते आहे.