अॅप बेस टॅक्सीचालकांचा आजपासून अघोषित संप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:28 AM2018-10-22T05:28:10+5:302018-10-22T05:28:20+5:30
अॅप बेस टॅक्सींचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपयांमध्ये असावे आणि प्रति किलोमीटरसाठी १८ ते २३ रुपये द्यावे
मुंबई : अॅप बेस टॅक्सींचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपयांमध्ये असावे आणि प्रति किलोमीटरसाठी १८ ते २३ रुपये द्यावे, या मागणीसाठी अॅप बेस टॅक्सीचालक सोमवारपासून अघोषित संप पुकारणार आहेत. शहरात सुमारे ४० ते ५० हजारांपेक्षा जास्त अॅप बेस टॅक्सी असल्याने लाखो मुंबईकरांना या संपामुळे मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
वाढत्या इंधन दरांमुळे ओला-उबर यासारख्या अॅप बेस टॅक्सी कंपन्यांनी दरपत्रक मात्र ‘जैसे थे’ ठेवले. यामुळे इंधन दरवाढीचा फटका थेट सर्वसामान्य चालकांना आणि मालकांना बसला. दरवाढीनुसार कंपन्यांनी दरपत्रकात बदल केले नाही. उलट प्रति किलोमीटर दर घटवल्याने चालक-मालकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे अॅप बेस टॅक्सींचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये यादरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये द्यावे, कंपनीने नवीन वाहने घेणे बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या आणि अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिम येथे उबेर कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे.
२० आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत सुमारे ८०० हून जास्त चालकांनी हजेरी लावली होती. सुरुवातीला काही महिने उत्पन्न दिले, मात्र त्यानंतर अॅप बेस टॅक्सी कंपन्यांनी भाडे देणे कमी केले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापासून ते परिवहन आयुक्तांपर्यंत सर्वांना पत्रव्यवहार केले, मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. परिणामी सोमवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
>स्वमालकीच्या वाहनांना काम
शहरातील वाहतूककोंडीमुळे बहुतांश मुंबईकरांकडून वातानुकूलित अॅप बेस टॅक्सीला पसंती देण्यात येते. सुरुवातीला खासगी कंपन्यांनी भरघोस उत्पन्न मिळेल अशी जाहिरातबाजी केली होती. यानुसार काही महिने वगळता कंपन्यांनी स्वमालकीच्या वाहनांना काम देण्यास सुरुवात केली. यामुळे ओला-उबर व्यवस्थापनाच्या मनमानी आणि अन्यायी कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.