Join us  

आज की नारी, अवयवदानात लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 9:59 AM

आपल्या देशात मानवी अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार अवयव प्रत्यारोपण केले जाते.

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

रातील एखाद्या व्यक्तीचा अवयव निकामी होतो, त्याला अवयवाची गरज असते. त्यावेळी बहुतांश वेळा घरातील महिला अवयवदान करण्यासाठी पुढे येत असते. मग कधी ती आई, बहीण, आजी, बायको, मावशी, आत्या या रूपात दिसत असते. अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जिवंतपणी अवयवदान करण्यामध्ये महिला अग्रेसर असल्याचे देश तसेच जागतिक पातळीवर दिसून आले आहे. आज महिला पुरुषांसोबत सगळ्याच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताना आढळत असल्या तरी महिलांचे अवयवदानरूपी प्रेम पुरुषांपेक्षा अधिक आहे, हे कटू सत्य मात्र कदापि विसरून चालणार नाही.

आपल्या देशात मानवी अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार अवयव प्रत्यारोपण केले जाते. या कायद्यात २०१४ मध्ये काही बदल करण्यात आले. जिवंतपणी अवयवदानात मुख्यत्वे किडनी आणि यकृताचा भाग (लिव्हर) या दोन अवयवांचा समावेश होतो. अनेकवेळा हे दोन अवयव निकामी झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून अवयवाचे प्रत्यारोपण करणे, हा एकमेव मार्ग असतो. प्रतीक्षा यादीवर नाव नोंदवून अवयव मिळण्यासाठी किती काळ जाईल, हे सांगणे कठीण असते. जवळच्या नातेवाइकाने अवयव दिल्यास रुग्णाचा अवयव मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मग घरात त्या रुग्णाला अवयव देणार कोण? यावर चर्चा सुरू होते त्यावेळी घरातील महिला अवयव देण्यास प्रथम पुढे येत असल्याचे चित्र संबंध देशात दिसून येते. फार कमी वेळा वडील, भाऊ, मुलगा, आजोबा अवयवदान करण्याकरिता पुढे आल्याचे दिसून आहे. या मागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही बघितली, तर पुरुषी मानसिकता यामध्ये दिसून येते. कर्ता पुरुष आणि महिलांचे आपल्या जवळील असणाऱ्या व्यक्तीवरचे प्रेम, घरातील आदरयुक्त दरारा तसेच महिलांची त्यागाची भावना ही पुरुषांपेक्षा अधिक असते.

मी आतापर्यंत जिवंत व्यक्तीच्या यकृताचा भाग घेऊन १,२०० यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी ८० टक्के अवयवदाते महिला आहेत. त्याचे कारण म्हणजे घरात अवयव देण्याची वेळ आली तर प्रथम महिलाच पुढे येतात. - डॉ. रवी मोहंका, संचालक, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सा विभाग, सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्येही उल्लेखवैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे नियतकालिक ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये सुद्धा या विषयाची दखल घेण्यात आली असून, त्यांनी सुद्धा जिवंतपणी अवयव देण्याच्या प्रक्रियेत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले आहे.

मी काही वर्षे परदेशात आणि सध्या भारतात किडनी विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझ्या २५ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये २ हजारांपेक्षा अधिक किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेत मी सहभागी आहे. जागतिक पातळीवर महिला किडनी देण्याचे प्रमाण ६०-६५ टक्के तर भारत हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे. आई, बायको आणि बहीण या मुख्य अवयवदात्या आहेत. कारण, आजही महिलांच्या तुलनेत आरोग्य सेवा पुरुषांना अधिक प्रमाणात मिळतात.- डॉ. जतीन कोठारी, संचालक, किडनीविकार विभाग, मॅक्स नानावटी हॉस्पिटल

 

 

टॅग्स :महिलाहॉस्पिटल