मुंबई - माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही स्वर्गीय राजीवजींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय स्वर्गीय राजीवजींना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे.
आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्मसमभाव कायम रहावा यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. राजीवजींचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.