Join us

करवतीने कापला गेलेला पायाचा अंगठा पुन्हा जोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 11:03 AM

पालिकेच्या कूपर रुग्णालयात आसामी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : मूळचा आसामचा असणाऱ्या मुंबईत उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणावर पालिकेच्या कूपर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. करवतीने कापलेला या तरुणाचा उजव्या पायाचा अंगठा प्लास्टिक सर्जरी द्वारे डॉक्टरांनी जोडला आहे.

सुतारकाम करत असताना त्याच्या उजव्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला. या अपघातादरम्यान पाय व पंजा वेगळे होऊन केवळ त्वचेच्या सहाय्याने लोम्बकळत होते. अशा परिस्थितीत त्वरित त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याच्यावर त्वरित सलग सहा तासांची जटिल शस्त्रक्रिया केली. महिन्याभराच्या उपचारानंतर तरुणाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याविषयी, रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जन विभागाचे डॉ. नितीन घाग यांनी सांगितले की, या प्रकारची सुघटन शल्य चिकित्सा पहिल्यांदाच रुग्णालयात करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कापल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांचा दुसरा भाग शोधून तो जोडणे, त्वचा जोडणे इ. बाबी करण्यात आल्या. तसेच अपघातादरम्यान तरुणाच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या हाडाचा भुगा झालेला होता. या ठिकाणी शस्त्रक्रिये दरम्यान धातूची पर्यायी पट्टी बसविण्यात आली. शस्त्रक्रिया करणाऱ्या चमुमध्ये भूलतज्ञ डॉ. सुनीलकुमार ग्वालानी, अस्थीरोगतज्ञ डॉ. एच जी. आगरकर, डॉ. अमित जोशी, प्लास्टिक सर्जन अनिष राऊत यांचा समावेश होता.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल