मुंबई : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारच्या मागच्या सीटवर बसून माता तान्हुल्याला दूध पाजत असताना, वाहतूक पोलिसांनी चक्क कार ‘टोइंग’ करून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या पित्यानेच या कृत्याचे मोबाइलमध्ये शूटिंग केले होते. त्यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. वाहतूक शाखेच्या प्रमुखांनी कॉन्स्टेबलचे निलंबन करत या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.मालाड (प.) एस.व्ही. रोड येथे शुक्रवारी एक युवक पत्नी व सात महिन्यांच्या बाळासह कारमधून जात होता. दुकानातून काहीतरी घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला कार थांबवून तो बाहेर पडला. त्याची पत्नी कारमध्ये मागच्या सीटवर तान्हुल्याला दूध पाजत असताना मालाड वाहतूक नियंत्रण शाखेतील ‘टोइंग’ची व्हॅन त्या ठिकाणी आली. नो पार्किंगमध्ये कार असल्याचे पाहून, गाडीवरील कॉन्स्टेबल शशांक राणे याने दोघा कर्मचा-यांना गाडीला टोइंग लावण्यास सांगितले.कॉन्स्टेबल शशांक राणे निलंबित : या प्रकरणी कॉन्स्टेबल शशांक राणेला शनिवारी निलंबित करण्यात आले. वाहतूक शाखेचे पश्चिम उपनगर विभागाचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अहवाल सादर केल्यानंतर सहआयुक्त अमितेशकुमार यांनी त्याचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात सुरुवातीला कारमध्ये कोणी नाही. मात्र टोइंग केल्यानंतर महिला पळत येऊन गाडीत बसल्याचे दिसत आहे.‘लॉक’ अडकवून कार उचलत असल्याचे तिच्या पतीने पाहिल्यानंतर, पळत येत ओरडत त्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याची पत्नीही गाडीतून ओरडू लागली. मात्र, कर्मचा-यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे निघाले.हा प्रकार लक्षात आल्यानंतर, तेथील नागरिकांनीही कॉन्स्टेबल व कर्मचा-यांना उद्देशून कारमध्ये महिला व बाळ असून, ‘त्यांना मार बसेल, गाडी थांबवा,’ असे ओरडून सांगितले. तरीही ते गाडी वेगाने नेऊ लागल्याने, युवकाने आपल्या मोबाइलमधून या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग केले. थोड्या वेळानंतर पोलिसांनी गाडी थांबविली.या घटनेचा व्हिडीओ महिलेने शनिवारी फेसबुकवर अपलोड केला. काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तान्हुल्याला पाजणा-या मातेसह कार केली ‘टोइंग’; वाहतूक पोलिसांचे कृत्य, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 5:04 AM