तुफान गर्दीने मेट्रो हाऊसफुल
By admin | Published: June 16, 2014 02:57 AM2014-06-16T02:57:21+5:302014-06-16T02:57:21+5:30
मागील आठवड्यातील रविवारी सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने पहिल्याच दिवशी २३० फेऱ्या पूर्ण करत तब्बल २ लाख प्रवासी वाहून नेल्यानंतर दुसऱ्या रविवारही मेट्रो राइडसाठी प्रवाशांनी तुफान गर्दी केली होती
मुंबई : मागील आठवड्यातील रविवारी सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने पहिल्याच दिवशी २३० फेऱ्या पूर्ण करत तब्बल २ लाख प्रवासी वाहून नेल्यानंतर दुसऱ्या रविवारही मेट्रो राइडसाठी प्रवाशांनी तुफान गर्दी केली होती. ही गर्दी रात्रीपर्यंत एवढी वाढली की, मेट्रोच्या घाटकोपर स्थानकावरील गेट बंद करावे लागले. तरीही प्रवाशांचा उत्साह ओसांडून वाहत असल्याने रात्री उशिरापर्यंत मेट्रो राइडच्या फेऱ्या सुरुच होत्या.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो सुरु झाली आणि मुंबईकर चाकरमान्यांना दिलासा मिळाला. मागील आठवड्यात मेट्रोच्या गर्दीने चक्क दहा लाखांचा आकडा गाठला. त्यात कालचा शनिवार आणि आजच्या रविवारने तर मेट्रो प्रवाशांच्या संख्येत भलतीच भर घातली. शनिवारी आणि रविवारी लहान मुलांना मेट्रोची सफर मोफत ठेवण्यात आल्याने मेट्रो रेल्वेला मुंबईकर कुटुंबीयांची तुफान गर्दी झाली होती. त्यातच रेल्वे मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांनी मेट्रोला निवडले. रविवारी सकाळपासून मेट्रोला झालेली ही गर्दी रात्री उत्तरोत्तर वाढत गेली. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशी मेट्रो राइड करण्यात प्रवाशांनी आजचा रविवार सत्कारणी लावला. वर्सोवा, अंधेरी आणि घाटकोपर या मेट्रोच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.
विशेषत: पावसाची रिमझिम सुरु असल्याने वर्सोवा येथील समुद्रकिनाऱ्याची मजा लुटण्यासाठी इथपर्यंत मेट्रोने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. मध्य रेल्वेचे घाटकोपर स्थानक मेट्रो रेल्वेला जोडण्यात आल्याने या रेल्वे स्थानकाहून मेट्रोकडे वळणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. विशेषत: यात राइडर्सची संख्या अधिक असल्याचे चित्र होते. घाटकोपर स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर दररोजच्या तुलनेत चौपट गर्दी झाली होती. हीच स्थिती मेट्रोच्या वर्सोवा स्थानकावर पाहण्यास मिळाली. वर्सोवा येथे उतरणारे प्रवासी सातबंगला आणि जुहू चौपाटी येथील मजेसाठी जात होते. त्यामुळे येथील समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली होती. मुळात मेट्रोची क्षमता दीड हजार प्रवाशांची एवढी आहे. मात्र रविवारच्या गर्दीमुळे दुप्पट प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती कळव्याच्या नीता शेट्टे आणि त्यांची कन्या प्राची शेट्टे यांनी दिली. तर मेट्रो वातानुकूलित असल्याने प्रवासाचा थकवा जाणवला नाही. आणि
जणू काही आपण परदेशातच
प्रवास करत आहोत, असा अनुभव आल्याचे घाटकोपरमधल्या भटवाडी येथील पल्लवी सोनावणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)