Join us

निवडणुकीसाठी काँग्रेस, स्वाभिमानी आणि जनआंदोलन समिती एकत्र

By admin | Published: April 10, 2015 12:13 AM

आगामी महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडण्यासाठी स्वाभिमानी वसईकर संघटनेने कंबर कसली आहे.

दीपक मोहिते, वसईआगामी महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडण्यासाठी स्वाभिमानी वसईकर संघटनेने कंबर कसली आहे. आघाडीला रोखण्यासाठी विरोधकांनी एकास एक उमेदवार द्यावेत, याकरीता संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. तर दुसरीकडे गेल्या खेपेस जनआंदोलन समितीच्या तिकीटावर निवडणुका लढवणारे आपापल्या पक्षात घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.लोकसभा निवडणुकीमध्ये बविआच्या बळीराम जाधव यांना प्रचंड मताधिक्याने पराभव झाल्यामुळे विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु विधानसभा निवडणूकीमध्ये बविआच्या आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर व आ. विलास तरे यांनी बाजी मारल्यामुळे विरोधकांच्या आनंदावर विरजण पडले. आ. ठाकूर यांच्यासमोर विवेक पंडीत यांचा दारुण पराभव झाल्यामुळे पंडीत हे सक्रीय राजकारणापासून दूर गेले आहेत. सध्या त्यांच्या जनआंदोलन समितीची धुरा त्यांच्या पूर्वीच्या कोअर कमिटीमधील काही पदाधिकारी सांभाळत आहेत. या पदाधिकाऱ्यांनी मनपा निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे लोकसंख्या व विधानसभा निवडणूकांमध्ये भुईसपाट झालेल्या काँग्रेस पक्षानेही मनपा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दोघांसमवेत समझौता करण्याच्या दृष्टीने स्वाभीमानी वसईकर संघटनेने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. बविआसमोर एकास एक उमेदवार दिल्यास यश मिळू शकेल असा आत्मविश्वास संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. गेल्या निवडणूकीच्यावेळी विरोधकांनी ग्रामीण भागातील गावांच्या समावेशावरून प्रचारात रान उठवले होते व त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे आटोकाट प्रयास होत आहेत. सध्या महानगरपालिके बाहेर असलेल्या २१ गावांच्या विकास नियोजनाचे अधिकार महानगरपालिकेला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयास विरोधी पक्षाचा कडाडून विरोध आहे. हे अधिकार सिडकोकडेच असावेत, अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. हाच मुद्दा होऊन प्रचाराची राळ उडवून देण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठी काँग्रेस, जनआंदोलन समिती व स्वाभिमानी वसईकर संघटना या तिघांची मोट बांधण्याची तयारी चालविली आहे.