आपण हे 'रॉकेट' खाली आणू शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 04:06 PM2020-11-12T16:06:57+5:302020-11-12T16:07:27+5:30
Diwali News : यंदा धुरमुक्त दिवाळी
मुंबई : फटाक्याच्या धुरामुळे आपल्या सर्वांना आणि विशेषतः कोरोनाबाधितांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच यावर्षी धुरमुक्त दिवाळी साजरा करूया, असे आवाहन करत मुंबई महापालिकेने आपण एकत्र मिळून हे 'रॉकेट' खाली आणू शकतो, असे म्हणत जनजागृती सुरु केली आहे. समाज माध्यमांचा यासाठी अधिकाधिक वापर केला जात असून, यंदाची दिवाळी धूर मुक्त आणि पर्यावरपूरक साजरी करूया, असेही आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळी साजरी करताना एकमेकांच्या घरी जाणे टाळावयाचे आहे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे द्याव्यात. नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे.
दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणा-या प्रत्येक व्यक्तिला हात – पाय – चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल. सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.