‘टुगेदरनेस’ हे योगाचे दुसरे नाव - राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:29 AM2018-12-29T06:29:10+5:302018-12-29T06:30:40+5:30
‘टुगेदरनेस’ हे योगाचे दुसरे नाव आहे. मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्याच्या जीवनाशी संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो.
मुंबई : ‘टुगेदरनेस’ हे योगाचे दुसरे नाव आहे. मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्याच्या जीवनाशी संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो. योग विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक महान व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या शताब्दी सोहळ्यादरम्यान केले.
वांद्रे पूर्वेकडील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर द योगा इन्स्टिट्यूटच्या शताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी सोहळ्याचे उद्घाटन झाले. या वेळी, ते म्हणाले की, इन्स्टिट्यूटने ट्रक चालकांसाठी ‘ट्रकासन’ या नव्या योग प्रकाराची निर्मिती संशोधन करून केली आहे. मार्च महिन्यात सौदी अरबमधील युवतीला, चीनमधील एका युवकाला योग कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती भवनात गौरविण्यात आले होते. १९३४ साली इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यात सोप्या योग प्रकारांची निर्मिती केलीे आहे. विशेषत: महिलांसाठी सोपी योगासने आहेत. आज या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली असली तरी येणाऱ्या काळात संस्थेला समाजाच्या संतुलित विकासासाठी, आरोग्यासाठी योगदान द्यायचे आहे.
द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले की, सर्वांनी कुटुंबाप्रमाणे राहिल्याने इन्स्टिट्यूटला शंभर वर्षे पूर्ण होऊ शकली. ‘स्वस्थ भारत’ या मोहिमेला पुढे न्यायचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग हवाच तरच भारत उच्च स्थानी पोहोचेल. या वेळी योगेंद्र यांच्या ‘योगा फॉर आॅल’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. पद्मश्री स्वामी भारत भूषण यांनी योग संदर्भात मत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते.
मन:शांतीसाठीही उपयुक्त
योगेंद्रजी यांनी योगाचा पाया रचल्यावर योग देशभर पोहोचला. सध्या योग देशासह जगभर पसरू लागला आहे. यात इन्स्टिट्यूटचाही मोठा हातभार आहे. केवळ शरीरस्वास्थ्यासाठीच योग मर्यादित नसून मन:शांतीसाठीही उपयुक्त आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आजची जीवनशैली पाहता योग शिकणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’चा नारा दिला आहे. स्वस्थ भारत हे उद्दिष्ट साध्य करताना योग अंगीकारणे आवश्यक आहे.
- श्रीपाद नाईक,
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (आयुष)
राजभवन परिसराची पाहणी
मुंबई : मुंबई दौºयावर असलेले राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी राजभवन परिसराची पाहणी केली. राजभवनात सापडलेले ब्रिटिशकालीन बंकर, राजभवन येथील ५६०० चौरस मीटर परिसरातील भव्य लॉन, संरक्षणासाठी नव्याने उभारलेल्या सात ते आठ फूट उंचीच्या भराव्याची पाहणी राष्ट्रपतींनी केली. ब्रिटीशकालीन बंकरची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपतींनी बंकर संवर्धन करण्याविषयी सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंकर संवर्धन व कोस्टल रोडबाबत राज्य सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्यपाल राव यांनी राजभवनात नव्याने बांधण्यात येणाºया दरबार हॉलबाबत माहिती दिली. ९०० आसन क्षमता असणारा नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालयाची इमारत जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण होईल, असे राज्यपालांनी सांगितले.