Join us

'टॉयलेट' एक भयान कथा, अडीच हजार नागरिकांसाठी एकच शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 5:27 AM

अंधेरीतील प्रकार : पर्यायी व्यवस्था न केल्याने गैरसोय

मुंबई : अंधेरी-मरोळ पाइप लाइन येथील अडीच हजार नागरिकांना एकाच शौचालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. येथील साईबाबानगरातील रघुनाथ शिंदे चाळ आणि नागोबा चाळीतील ४० वर्षांपूर्वीचे जुने सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजीनगर क्रमांक १ व साईबाबानगरातील अडीच ते तीन हजार नागरिकांना एकाच शौचालयाचा वापर करावा लागत आहे.

महापालिकेच्या सूचनेनुसार, शौचालय धोकादायक स्थितीत असून, त्याचा नागरिकांनी वापर करू नये. परिसरातील पर्यायी शौचालयाचा वापर करावा, असे सांगण्यात आले होते, परंतु शौचालय कोणत्या निष्कर्षाने धोकादायक ठरविले, याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, तसेच शौचालय तोडण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता अथवा विश्वासात न घेता आणि कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता महापालिकेने शौचालय तोडले, अशी माहिती अंधेरी, पूर्व विधानसभा मनसे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी दिली.महापालिकेच्या के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना याबाबत विचारले असता, साईबाबानगरमध्ये दोन सार्वजनिक शौचालये होती. दोनपैकी एक शौचालय तानसा जलवाहिनीच्या कामात गेले. दुसरे शौचालय तोडण्यासाठी न्यायालयाचा आदेश होता. मशिदीजवळच्या शौचायलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तानसा जलवाहिनीजवळच्या शौचालयासाठी विशिष्ट जागेची आवश्यकता असून, ते शोधण्याचे काम सुरू आहे. जागा उपलब्ध झाली की, लगेच शौचालयाची उभारणी करण्यात येईल.साईबाबानगर येथे दोन शौचालये होती. त्यांची डागडुजी अपेक्षित होती. मात्र, महापालिकेने नोटीस लावून शौचालय तोडले. परिसरातील रहिवासी एकाच शौचालयाचा वापर करत आहेत. त्यामुळे एका शौचालयावर भार पडू लागला आहे, तसेच नागरिकांकडून शौचालयासाठी जास्तीचे पैसेही उकळले जात आहेत. - सुशांत कासारे, स्थानिक रहिवासी.

टॅग्स :मुंबईस्वच्छ भारत अभियान