Join us

म्हाडा परीक्षेतील टॉपर उमेदवारांच्या यशाचं 'टॉयलेट' गुपित उघडलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 5:31 AM

टॉपर उमेदवारांच्या यशाचा मार्ग ‘प्रसाधनगृह’, पहिल्या तासात शून्य, दुसऱ्या तासात सोडविले १५० प्रश्न

मनीषा म्हात्रेमुंबई : ऑनलाईन परीक्षा सुरू असल्याचा फायदा घेत सतत प्रसाधनगृहात जाणाऱ्या उमेदवारांचे ‘टॉयलेट’ गुपित अखेर म्हाडाच्या अहवालातून उघडकीस आले आहे. प्रसाधनगृहात जाण्यापूर्वी शून्य प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवारांनी प्रसाधनगृहातून आल्यानंतर थेट १०० ते १५० प्रश्न सोडविल्याची बाब समोर आली आहे. प्रसाधनगृहाच्या बहाण्याने कॉपी करून टॉप केल्याचे स्पष्ट होताच, राज्यभरातील ६० उमेदवारांविरोधात  खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

म्हाडामध्ये प्रशासकीय अधिकारी प्राधिकरण म्हणून कार्यरत असलेले आशिष गजानन वैदय (४५) यांच्या तक्रारीनुसार, म्हाडा आस्थापनेवरील तांत्रिक व अतांत्रिक १४ सवंर्गातील एकूण ५६५ पदांसाठी यावर्षी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील १०६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्या. यादरम्यान डमी उमेदवार, तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासह कॉपी करताना आढळून आल्याप्रकरणी राज्यात नऊ गुन्हे दाखल झाले. कोविड असल्याने प्रत्येक उमेदवाराचे बायोमॅट्रिक शक्य नसल्याने सर्वांचे फोटो काढण्यात आले. निकाल लागल्यानंतर एकूण ५६५ पदांकरिता १,६३३ गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यापूर्वी, या सर्व उमेदवारांचे टी.सी.एस. प्रा. लि कंपनीमार्फत केलेल्या तपासणीमध्ये ६० परीक्षार्थी संशयित आढळून आले.

म्हाडा परीक्षेत गैरप्रकार कसे शोधले?  त्यात उमेदवारांचे सीसीटीव्ही फुटेज, लॉग डिटेल्सबाबतचा अहवाल, उमेदवारांच्या कच्चा कामाचे कागद, तसेच कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांची सामान्य प्रश्न विचारून केलेल्या संक्षिप्त चौकशीच्या आधाराने म्हाडा प्रशासनाने अहवाल तयार केला. 

चौकशीत काय आढळले?३९ उमेदवारांनी डमी उमेदवार बसविले.२१ उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी पहिल्या तासात शून्य ते २० प्रश्न सोडविले, तर दुसऱ्या तासात प्रसाधनगृहात जाऊन आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे १०० ते १५० प्रश्न सोडविले. प्रत्येक प्रश्न सोडविण्याची वेळ ६ ते ७ सेकंद दिसून आली.

म्हाडाच्या तक्रारीवरून ६० जणांविरोधात परीक्षेमध्ये गैरप्रकार करून म्हाडा व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. - राजेंद्र पांडुरंग मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खेरवाडी 

टॅग्स :म्हाडाधोकेबाजी