हागणदारीमुक्त मुंबईत अंधेरीतील शौचालय दुरवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:28 AM2017-11-22T02:28:15+5:302017-11-22T02:28:57+5:30
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड येथील सवेरा सोसायटीतील शौचालयाची दुरवस्था झाली आहे.
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड येथील सवेरा सोसायटीतील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. परिसरात २०० कुटुंब असून, एकही चांगले शौचालय रहिवाशांसाठी नाही. संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदन आणि पत्रव्यवहार करूनदेखील कोणीच लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. परिणामी, लवकरात लवकर शौचालय दुरुस्ती किंवा नवे शौचालय बांधून दिले नाही, तर बेमुदत उपोषण छेडले जाईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
वीरा देसाई रोडवरील सवेरा सोसायटी येथे शौचालयांची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, जिल्हाधिकारी, म्हाडाकडे पत्रव्यवहार करण्यात आले आहेत, तरी शौचालय पुनर्बांधणीची दखल प्रशासन घेत नाही. येथे सहा शौचालये
असून, त्यातली दोनच शौचालये
सुरू आहेत. त्यामुळे
सकाळी शौचासाठी प्रचंड गर्दी
होते. सद्यस्थितीमध्ये शौचालयात सांडपाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयातील सांडपाण्याची टाकी वारंवार ओव्हरफ्लो होते. शौचालयाचे शौचकूप मोडक्या अवस्थेत आहेत. दारे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर आंदोलन छेडू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
दरम्यान, शौचालयाच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेविका रंजना पाटील यांच्याशी फोन आणि संदेशद्वारे संपर्क केला
असता, कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.
शौचालयातील चार शौचालये बंद आहेत. शिवाय शौचालय सांडपाण्याने ओव्हरफ्लो होत असून, हे दुर्गंधीचे पाणी रहिवाशांच्या घरात जाते. सांडपाण्याची लाइन उघड्या गटारात सोडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पत्रव्यवहार करूनही प्राथमिक गरजेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- बाबू धनगर, रहिवासी.