मुंबई : अंधेरी पूर्वेकडील गणेशनगर येथील सार्वजनिक शौचालय गेल्या कित्येक दिवसांपासून खचलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शौचालयाची पुनर्बांधणी करण्यासाठी रहिवाशांनी संबंधित प्रशासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केले होते. आता जून महिन्यात सार्वजनिक शौचालय संपूर्ण पाडून पुन्हा नव्याने बांधण्याचे काम आमदार निधीतून केले जाणार आहे; परंतु रहिवाशांना सद्यस्थितीत तात्पुरती मोबाइल टायलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परिणामी, नाईलाजाने रहिवाशांना खचलेल्या शौचालयाचा वापर करावा लागत आहे.काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते शौचालयाची पाहणी करण्यासाठी आले होते. शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात जून महिन्यात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेमधूनही शौचालयाच्या बांधकामाविषयी विचारपूस करण्यासाठी फोन आला. काय दुरुस्त करायचे आहे, अशी विचारणा अधिकाºयाने केली. यावरून महापालिका आणि म्हाडा यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाही, हे स्पष्ट होते. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर शौचालयाची तक्रार करण्यात आली होती. म्हाडा शौचालय बांधून देणार, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. रहिवाशांनी शौचालयाचा आराखडा तयार केला असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शौचालये पूर्णपणे तोडून टाकल्यावर पर्यायी व्यवस्था काय? असा प्रश्न विचारल्यावर महापालिकेने काहीच उत्तर दिले नाही, अशी माहिती स्थानिक दयानंद सावंत यांनी दिली.
‘ते’ रहिवासी वापरताहेत खचलेले शौचालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:49 AM