Join us  

कोळीवाड्यांमध्ये महिलांसाठी शौचालय, स्नानगृह; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 6:10 AM

या सर्व कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई : ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगारांसाठी पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई पोर्ट ॲथॉरिटीची परवानगी घ्यावी. मच्छिमार बांधव आणि कामगार महिलांसाठी शौचालय, स्नानगृह, वेगवेगळे विश्रामगृह उभारावे. या सर्व कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ससून डॉक कुलाबा, कफ परेड, वरळी आणि माहीम येथील कोळीवाडा बंदरे (जेट्टी) आणि वसाहतींची दीपक केसरकर यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. केसरकर म्हणाले की, मच्छिमार नौकांना डिझेल पुरवठ्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी. मच्छिमार, सर्व कामगारांसाठी पिण्याचे पाणी तत्काळ उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याच्या टाक्या बसवाव्यात. 

डॉक परिसरात हायमास्ट लॅम्प, पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसवावे. ससून डॉक येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करावे. या ठिकाणी ब्रेकवॉटरची मागणी मच्छिमारांकडून होत असून ब्रेकवॉटर तयार करून त्यांना दिलासा द्यावा. मालाच्या लिलावासाठी लिलाव हॉल, वितरण मार्केट उपलब्ध करावे. कचऱ्याची विल्हेवाट लावावी. 

कोळीवाड्याचे सौंदर्यीकरणकफ परेड कोळीवाडा परिसराच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करावा. आराखड्यामध्ये मच्छिमारांसाठी आरसीसी शेड,संरक्षण भिंत बांधणे,सोलर ड्रायर बसवणे,बंदिस्त प्रवेशद्वार बांधणे,रस्ता बांधणे ही कामे समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. वरळी कोळीवाडा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. या कोळीवाड्याच्या सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - दीपक केसरकर, पालकमंत्री

टॅग्स :दीपक केसरकर