मुंबई : पालिकेतील सत्ताधाऱ्यांशी पुन्हा मैत्रीचे सूर जुळल्यामुळे पहारेकऱ्यांचा विरोध मावळला आहे. यामुळे आपले महत्त्वाकांक्षीप्रस्ताव मंजूर करून घेण्याचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ५०० चौ. फुटांच्या मालमत्तांना करमाफ करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झाला. त्याचबरोबर, बेस्ट उपक्रमाच्या भंगारात काढलेल्या बसगाड्यांमध्ये फिरते शौचालय तयार करण्याच्या शिवसेनेच्या मागणीलाही पालिका महासभेत हिरवा कंदील मिळाला आहे. भाजपाने मौन बाळगल्यामुळे काँग्रेसचा विरोध डावलून ही मागणी मंजूर झाली.बेस्ट उपक्रम मुंबईची शान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बेस्टच्या बसगाड्या भंगारात काढण्याऐवजी त्याचे रूपांतर शौचालयात करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये तीव्र विरोध झाला होता, तरीही पालिकेच्या महासभेत ही ठरावाची सूचना मंजुरीसाठी मांडण्यात आली. मात्र, मुंबईत २२ हजार शौचकुपे बांधण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. पालिका अथवा एमएमआरडीए यांनी मेट्रो रेल्वेजवळ शौचालये उभारावी, बेस्टच्या जुन्या बसगाड्यांचा वापर शौचालयांसाठी करू नये, अशी कळकळीची विनंती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांनी आपल्या व्हॅनचे स्वच्छतागृहात रूपांतर केले आहे. त्याच धर्तीवर बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या काही बसगाड्यांचे फिरत्या शौचालयात रूपांतर करून महामार्ग, गर्दीच्या रस्त्यावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. ही मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मतास टाकून बहुमताने मंजूर केली. भाजपाने या सूचनेबाबत मौन बाळगल्यामुळे काँग्रेसचा विरोध एकाकी पडला.आयुक्त घेणार निर्णयकाँग्रेसचा विरोध डावलून शिवसेनेने ही मागणी बहुमताने पालिकेच्या महासभेत मंजूर केली. ही ठरावाची सूचना आता आयुक्त अजय मेहता यांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांनी यावर अनुकूलता दाखविल्यास बेस्ट उपक्रमाच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये फिरते शौचालय तयार होणार आहे....म्हणून फिरत्या शौचालयांची गरजमोनो आणि मेट्रो रेल्वेचे खोदकाम, रस्त्यांची, पुलांची कामे, फेरीवाले यांच्या अडथळ्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालयांची सोय नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व मधुमेहाच्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या भंगारात काढण्यात आलेल्या बसगाड्यांमध्ये फिरते शौचालये उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.शिवसेनेचा युक्तिवादपदपथावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यावर मुंबई महापालिकेने आपल्या धोरणातून निर्बंध आणले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला शौचालये उभारण्यात येत नाही. पोलीस दलाने बंदोबस्तावर असलेल्या आपल्या कर्मचाºयांच्या सोयीसाठी आपल्या व्हॅनचे स्वच्छतागृहात रूपांतर केले आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या काही बसगाड्यांचे फिरत्या स्वच्छतागृहात रूपांतर करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.
भंगारातील ‘बेस्ट’ बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:28 AM