चेंबूरमध्ये जलवाहिनीवर शौचालय
By Admin | Published: March 14, 2016 02:08 AM2016-03-14T02:08:20+5:302016-03-14T02:08:20+5:30
एम-पश्चिम कार्यालयात काम करणाऱ्या एका पालिका कर्मचाऱ्याने चेंबूरमध्ये जलवाहिनीवर सार्वजनिक शौचालय उभारले आहे.
मुंबई : एम-पश्चिम कार्यालयात काम करणाऱ्या एका पालिका कर्मचाऱ्याने चेंबूरमध्ये जलवाहिनीवर सार्वजनिक शौचालय उभारले आहे. या कर्मचाऱ्यावर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शौचालय बांधण्यासाठी तिथे वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाद्वारे देशभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यात शौचालय बांधण्याचाही प्रस्ताव असून, याच योजनेतून चेंबूरच्या टेंभी उड्डाणपुलाखाली हे शौचालय बांधण्यात येत आहे. मात्र या पुलाखाली पूर्वीपासून दोन
शौचालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी गरज नसताना एम-पश्चिम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शौचालय बांधण्यास परवानगी दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे शौचालय बांधणारी व्यक्ती एम-पश्चिम विभागात ‘इमारत मुकादम’ या पदावर काम करते. त्यामुळे तत्काळ मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या जागेपेक्षा अधिक जागेत हे शौचालय उभारण्यात आले आहे.
काही रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर एम-पश्चिमचे सहायक आयुक्त हर्षद काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र अद्यापही या प्रकरणी कारवाई झालेली नाही. शौचालयालगत जलवाहिनी असल्याने पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या शौचालयाचे बांधकाम थांबवण्यात यावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)