महापालिकेच्या सर्वेक्षणात घाटकोपर येथील शौचालये ठरली सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:52 PM2020-01-14T16:52:07+5:302020-01-14T16:52:35+5:30
‘पैसे द्या व वापरा’ या तत्वावर या शौचालयाची देखभाल केली जात आहे.
मुंबई - महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान मध्यवर्ती यंत्रणेमार्फत नियुक्त संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील दोन शौचालयांना प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. शौचालयांमध्ये उच्च दर्जाची स्वच्छता, आधुनिक पद्धतीचे बांधकाम या निकषानुसार स्वच्छता सर्वेक्षण - २०२० साठी या शौचालयांना रेटिंग देण्यात आले आहे.
घाटकोपर (पश्चिम) येथील आझाद नगर सुविधा सेंटर हे ३२ आसनी असून उत्कृष्ट सामुदायिक शौचालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर घाटकोपर (पूर्व) द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर पम्पिंग येथील हायवे सुविधा येथील १२ आसनी शौचालयही सर्वोत्तम ठरले आहे.
‘पैसे द्या व वापरा’ या तत्वावर या शौचालयाची देखभाल केली जात आहे. या शौचालयांमध्ये आंघोळीची सुविधा, पाण्याचा पुनर्वापर व पर्जन्य जलसंचयनची सुविधा, लहान बाळांकरिता स्तनपान खोली, अभ्यासिका, शौचालयाची सुविधा व मुतारी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. आधुनिक पद्धतीने ही शौचालये बांधण्यात आलेली आहेत.