शौचालयाची जागा बिल्डरच्या घशात
By admin | Published: February 2, 2016 02:14 AM2016-02-02T02:14:51+5:302016-02-02T02:14:51+5:30
एकीकडे देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असताना चेंबूरच्या साईबाबा नगरात पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे
मुंबई: एकीकडे देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असताना चेंबूरच्या साईबाबा नगरात पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पालिका दुर्लक्ष करत असल्याने येथील शौचालयांचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. तर शौचालयांची देखील मोठी दुरावस्था झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
पूर्व दुर्तगती मार्गावरील चेंबूर सेल कॉलनी येथे हे साईबाबा नगर आहे. येथे दीड ते दोन हजार कुटुंबिय वास्तव्य करत आहेत. पाच वर्षांपूर्वी येथील रहिवाशांना पुरेशी शौचालये याठिकाणी होती. मात्र एका खासगी विकासकाने याठिकाणी एसआरएच्या नावाखाली काही झोपड्या तोडून दोन इमारती तयार केल्या. यातील एका इमारतीमध्ये स्थानिक रहिवाशी राहत आहेत.
तर दुसऱ्या इमारतीमधील घरे या विकासकाने विकली आहेत. मात्र या नवीन इमारती शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयांमुळे विकासकाचे रुम विकले जात नव्हते. त्यामुळे त्याने काही पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही शौचालये तोडून टाकली. येथील रहिवाशांनी विकासकाला विरोध केला असता, त्याने बाजूलाच असलेल्या दुसऱ्या शौचालयांवर बांधकाम करुन नव्याने शौचालय उभे केले. तसेच या शौचालयाची संपूर्ण डागडुजी करण्याची जबाबदारी त्याने घेतली होती. याबाबत स्थानिक रहिवाशांनी एम पश्चिम विभागाचे
सहाय्यक आयुक्त हर्षद काळे आणि स्थानिक नगरसेविका यांना अनेक तक्रारी दिल्या.
मात्र त्यांच्याकडून कानाडोळा केला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अखेर रहिवाशांनी ही बाब येथील मनसेचे स्थानिक नेते नितीन नांदगावकर यांच्यासमोर मांडली. त्यांनी हे तुंबलेले ड्रेनेज लाईन तत्काळ साफ करत ही समस्या काही प्रमाणात सोडवली. मात्र शौचालयाची मोठी दुरावस्था असल्याने पालिकेने तत्काळ लक्ष घालून डागडुजी करावी अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन इशारा नांदगावकर यांनी दिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत शौचालयांची डागडुजी न झाल्याने शौचालयांचे दरवाजे पूर्णपणे तुटले आहेत. काही शौचकूप वापरण्यालायक देखील राहिलेले नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून या शौचालयांची ड्रेनेज लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. मुख्य रस्त्यावर देखील दुर्घंधी पसरल्याने रहिवाशांना तोंडावर रुमाल बांधून येथून जावे लागत आहे. (प्रतिनिधी)