Join us

देशाच्या संस्कृतीतच सहिष्णुता - मुख्यमंत्री

By admin | Published: April 09, 2016 2:41 AM

‘देशावर इतकी अतिक्रमणे आणि आक्रमणे झाली तरीही हा देश टिकला. याचे मुख्य कारण या देशाच्या संस्कृतीत सहिष्णुता आहे

मुंबई : ‘देशावर इतकी अतिक्रमणे आणि आक्रमणे झाली तरीही हा देश टिकला. याचे मुख्य कारण या देशाच्या संस्कृतीत सहिष्णुता आहे. सर्व प्रकारच्या विचारांना आपल्यात सामावून घेण्याची ताकद आहे. संस्कृती जिवंत असेल तरच देश जिवंत राहील. ज्यांना संस्कृतीचा अभिमान नसतो त्यांना भूतकाळ असतो मात्र भविष्यकाळ नसतो,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. मराठी नववर्षानिमित्त गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘नववर्ष संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे वसंतराव बेडेकर, अ‍ॅड. शशिकांत पवार, डॉ. अनुराधा पोद्दार, योगेश प्रभू उपस्थित होते. गेल्या १४ वर्षांपासून गिरगावात निघत असलेल्या नववर्ष स्वागतयात्रेचे मुख्यमंत्रांनी कौतुक केले. ‘राष्ट्रभक्त युवा’ एकत्रित येऊन आपल्या संस्कृतीचे, धर्माचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नववर्ष स्वागताचा सोहळा साजरा करीत आहेत. ही संस्कृती नित्य नूतन आहे. जे वाईट आहे त्याचा आपल्या संस्कृतीने त्याग केला असून, सर्व भेदभाव दूर सारले आहेत. देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. महिलांच्या सहभागाशिवाय विकास अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)