विमानतळावरील टोल नाका सेनेने पाडला बंद
By admin | Published: May 24, 2017 02:46 AM2017-05-24T02:46:45+5:302017-05-24T02:46:45+5:30
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर जीव्हीके कंपनीकडून चालण्यात येणाऱ्या टोल नाक्यावर शिवसेनेने दुपारी जोरदार आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर जीव्हीके कंपनीकडून चालण्यात येणाऱ्या टोल नाक्यावर शिवसेनेने दुपारी जोरदार आंदोलन केले. सर्व प्रकारच्या वाहनांकडून टोल टॅक्सच्या नावाखाली १३० रुपये आकारणे, बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सेनेने हा टोलनाकाच बंद पाडला.
अंधेरी पूर्व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टोल टॅक्स विनाविलंब रद्द करण्याची मागणी आमदार अॅड. अनिल परब यांनी यावेळी केली.
यावेळी शिवसैनिकांनी टोल नाक्याची तोडफोड करत येथील पावती पुस्तकेही फाडली. परब म्हणाले की, टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाकडून १३० रुपये टोल वसूल केला जात आहे. त्याला अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला होता. तरीही टोलवसुली सुरू होती. विमानतळावर सगळीच वाहने थांबत नाहीत. तरीही नागरिकांनी टोलचा भुर्दंड का म्हणून सहन करायचा? असा सवाल परब यांनी उपस्थित केला.