लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई -
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाई महापालिकेने तीव्र केली आहे. त्यामुळे पोलिस आणि पालिकेच्या कारवाईत मंगळवारी दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना दंड करण्यात आला आहे. मात्र बोगस मार्शलबाबत तक्रार वाढत असल्याने पालिकेने आता नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तसेच मार्शलना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव याची खातरजमा करुन घेण्याचे आवाहन पालिका प्रशसानाने केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य उपाययोजना बरोबर सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र कोवडचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर बहुतांशी लोकांनी मास्क लावणे सोडले. आता मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. अशावेळी विना मास्क फिरणारे कोरोनाचा प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे पालिकेने पुन्हा कारवाई तीव्र केली आहे. मात्र क्लीन अप मार्शलबरोबर नागरिकांचे वारंवार खटके उडत आहेत.
क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी, गणवेष परिधान केलेला आहे का? त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असल्याची खातरजमा करुन नागरिकांनी दंडाची रक्कम भरावी व पावती देखील घ्यावी. तसेच कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.