Join us

सेतू ओलांडण्याआधी शिक्षकांना अध्ययन निष्पत्तीचा टोल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:06 AM

मुंबई - कोरोना परिस्थितीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद आणि याही शैक्षणिक वर्षात शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन ...

मुंबई - कोरोना परिस्थितीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद आणि याही शैक्षणिक वर्षात शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने होत आहे. अशा परिस्थितीत गेल्या इयत्तेची विद्यार्थ्यांना उजळणी करता यावी; तसेच अवघड पाठ्यक्रम समजण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातील सेतू अभ्यासक्रमाचा उपक्रम गुरुवार एक जुलैपासून राबविण्याचा निर्णय झाला. मात्र, या सेतू अभ्यासक्रम राबविण्यात अनेक संभ्रम आणि अडथळे असतानाच आता शिक्षकांमार्फत अध्ययनाची परिणामकारकता जाणून घेण्यासाठी संशोधन हाती घेण्याचे फर्मान एससीईआरटीकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सेतू अभ्यासक्रमाचा दिवसांचा उपक्रम पार करण्याआधी हा अध्ययन निष्पत्तीच्या संशोधनाचा टोल शिक्षकांना भरावा लागणार आहे.

राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तेतील विद्यार्थ्यांची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे मंकीच्या माध्यमातून लिंक तयार करण्यात आली असून या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना एससीईआरटी संचालकांकडून राज्यातील शिक्षणाधिकारी, उपसंचालकांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती केवळ ४ दिवसांत संकलित करायची असून एससीईआरटीकडून देण्यात आलेली लिंक उघडत नसल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांकडून आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात वर्गातील पटावर अद्याप विद्यार्थी किती हेही निश्चित नसताना फक्त ४ दिवसांत ही माहिती कशी संकलित करायची, असा यक्षप्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित करत आहेत.

या संशोधनात प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी ४० विद्यार्थ्यांची माहिती गोळा करायची? असून यामध्ये २ री व ३ रीच्या प्रत्येकी ५ आणि, तर चौथी ते ८ वी च्या प्रत्येक इयत्तेतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, स्मार्टफोन अशा सुविधांची सोय नाही अशा विद्यार्थ्यांची स्थिती ही या संशोधनातून पुढे येणे आवश्यक असल्याने अशा भागांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ५०% असावे, असे एससीईआरटीकडून सुचविण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या आधी आपली आधीच्या इयत्तेची पुस्तके परत केली आहेत त्यांनी उजळणी कशी करायची? पीडीएफ स्वरूपातील सेतू अभ्यासक्रमाच्या प्रती काढण्याचा खर्च कोण उचलणार? विद्यार्थ्यांना ४५ दिवसांच्या उजळणी अभ्यासक्रमासाठी आर्थिक भुर्दंड का? अशा प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी शिक्षण विभागाकडून सेतू अध्ययनापूर्वीची विद्यार्थी स्थिती जाणून घेण्याचा काय उपयोग, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम कपात करणार का?

नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवातीचे ४५ दिवस सेतू अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्याधीचे १५ दिवसही असेच गेल्याने नवीन अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत यंदा असलेल्या अभ्यासक्रमात काही कपात करण्यात येणार आहे का ? त्याबद्दल काही धोरण शिक्षण विभाग ठरविणार आहे का ? याची स्पष्टता मुख्याध्यापक, शिक्षक मागत आहेत.