Join us

राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 3:12 PM

Nana Patole on Ram Mandir: भाजपच्या राम मंदिर निधी संकलन अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे

राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून देशभर निधी संकलन केलं जात आहे. भाजपच्या या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. "भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरूय", असा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला आहे. (Nana Patole allegations on bjp over ram mandir fund collection in state)

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित करावं लागलं. 

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपसमोर अनेक सवाल उपस्थित केले. "राम मंदिराच्या नावानं टोलवसुली केली जातेय. भाजपला हा अधिकार कुणी दिला? ज्यानं राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातोय अशी एक तक्रार देखील माझ्याकडे आलीय", असं नाना पटोले यावेळी म्हणाले. 

"महाराष्ट्रामध्ये भगवान रामाच्या नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण? त्यांना ठेका दिलेला आहे का? केंद्र सरकारनं याचा उत्तर द्यायला हवं", असे सवाल उपस्थित करत नाना पटोले आक्रमक झाले होते. 

फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तरनाना पटोलेंच्या आरोपांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. "राम मंदिरावर बोलायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र चर्चा लावा. राम मंदिराच्या मुद्द्यासाठी आजची चर्चा नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला. आणि ज्यांना खंडणी वसुल करायची सवय आहे. त्यांना समर्पण कळू शकत नाही", असा टोला फडणवीस यांनी हाणला.  

टॅग्स :नाना पटोलेदेवेंद्र फडणवीसराम मंदिरमहाराष्ट्र विकास आघाडी