Join us

आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आयएल अँड एफएस विकणार टोल रोड?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 6:31 AM

एलआयसीने पुढाकार घ्यावा

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) आपले टोल रोड प्रकल्प नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाला (एनएचएआय) विकू शकते, अशी माहिती एनएचएआयच्या सूत्रांनी दिली.

आयएल अँड एफएसने असे १४ टोल रोड प्रकल्प निवडले असून त्यातून १६००० कोटी उभे होऊ शकतात. हे प्रकल्प आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क या उपकंपनीने बांधले आहेत हे विशेष. या कंपनीकडे आयएल अँड एफएसचे १७००० कोटी कर्ज थकीत आहे. त्याची परतफेड टोल प्रकल्प एनएचएआयला विकून करण्याचा कंपनीचा इरादा आहे. याचबरोबर आयएल अँड एफएस एनर्जी या कंपनीकडे बँकांचे जवळपास १०,००० कोटी कर्ज थकीत आहे. दरम्यान, सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिसने (एसएफआयओ) आयएल अँड एफएस या मूळ कंपनीच्या हिशेब वह्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. संचालकांनी कंपनीचा पैसा इतरत्र वळविला आहे काय? यावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत. कंपनीला बँक आॅफ इंडिया (२३८८ कोटी), स्टेट बँक आॅफ इंडिया (२१४० कोटी), पंजाब नॅशनल बँक (१८५९ कोटी) व येस बँक (१८४१ कोटी) यांनी कर्ज दिले आहे. कर्जाच्या ओझ्याने कंपनी संकटात आल्याचा निष्कर्ष तपास संस्थेने काढला आहे.आयएल अँड एफएसमध्ये २५% भांडवल लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एलआयसी) आहे. याशिवाय जपानची ओरिक्स कॉर्पोरेशन (२३ टक्के) व अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी (१२ टक्के) यांचाही भागधारकांत समावेश आहे. आयएल अँड एफएसला पुन्हा रुळावर आणण्यासाठी एलआयसीने पुढाकार घ्यावा, अशी चर्चा सध्या वित्त मंत्रालयात सुरू आहे, अशी माहिती एसएफआयओच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :अर्थव्यवस्थामुंबईव्यवसाय