ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गावर पथकर आकारणी; अटल सेतूवरून येणाऱ्यांनाच टोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:49 PM2024-10-26T12:49:09+5:302024-10-26T12:49:24+5:30
या मार्गावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ३ लेनची उभारणी केली जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह या भुयारी मार्गावर टोल आकारण्यात येणार आहे. मात्र, ही पथकर आकारणी केवळ अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांकडूनच केली जाणार असून पूर्व मुक्त मार्गावरून येऊन या भुयारी मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांकडून पथकर आकारणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना थेट मरिन ड्राइव्हला आणि नरिमन पाइंट येथे विनाअडथळा पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ट्विन टनेलची उभारणी केली जात आहे. हा मार्ग ९.२३ किमी लांबीचा असून त्यातील बोगद्यांची लांबी ६.५२ किमी असेल. या मार्गावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ३ लेनची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल ९१५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील १८३२ कोटी रुपयांचा खर्च हा एमएमआरडीएकडील निधी आणि राज्य सरकारच्या दुय्यम कर्जातून केला जाईल. तर उर्वरित ७३२६ कोटी रुपयांचा निधी बाह्य वित्तीय संस्थांकडून कर्जातून उभारला जाईल. या कर्जाच्या परतफेडीसाठी या मार्गावर पथकर आकारण्यात येणार आहे.
प्रकल्पाची माहिती
- प्रकल्पाचा खर्च - ९१५८ कोटी रु.
- एकूण लांबी - ९.२३ किमी
- दोन ट्विन टनेलची एकत्रित लांबी - ६.५२ किमी
- भुयारी मार्गिका दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी - ३ मार्गिका
वाहतूककोंडीची भीती
- या भुयारी मार्गाच्या सुरुवातीला पथकर आकारणी केल्यास त्या भागात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
- तसेच काही वाहने पथकर वाचविण्यासाठी पी. डिमेलो मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे.
- परिणामी दक्षिण मुंबईत अंतर्गत भागात वाहतूककोंडी होण्याची भीती आहे.
- त्यातून पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांकडून पथकर आकारणी केल्यास या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.
- या पार्श्वभूमीवर पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांकडून कोणताही पथकर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
- मात्र, अटल सेतवरून येणाऱ्या वाहनांकडून बाहेर पडतानाच पथकर घेतला जाणार आहे.