मुंबई : मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या टोल नाक्यांवर कार, स्कूल बस आणि एसटी महामंडळाच्या बसला टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा लाभ प्रवाशांना होताना दिसत असून टोल भरतेवेळी होणाऱ्या कोंडीतून त्यांची सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक जलद झाल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईतील टोल नाक्यांवर सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळच्या सुमारास नेहमीच गर्दी असल्याचे चित्र असे. शहरात दरदिवशी कामानिमित्त येणाऱ्या कारचालकांना या कोंडीत कधी कधी तासनतास अडकून पडावे लागत असल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. तसेच टोलचा भुर्दंड बसत होता तो वेगळाच. मात्र टोल माफीचा निर्णयाने त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
पैसे, वेळ दोन्ही वाचले...दरदिवशी मी मीरा भाईंदर येथून मुंबईत कारने येतो. दहिसर टोल नाक्यावर दरदिवशी ९० रुपये टोल भरावा लागत होता. महिनाभराचा जवळपास १५०० रुपयांचा भुर्दंड आता टोल माफीमुळे वाचला आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. दरदिवशी कोंडीमुळे सकाळी हा टोल नाका पार करण्यासाठी किमान १५ मिनिटे वाया जात होती. मात्र मंगळवारी टोल नाक्यावर वाहने जलद जात होती. त्यातून प्रवासाचा वेळ वाचला. दुपारच्या सुमारास मात्र रस्त्यावर गर्दी होती, अशी प्रतिक्रिया प्रवासी महादेव शिरसाट यांनी दिली.