टोमॅटोच्या किमती उतरल्या; कवडीमोल भाव मिळत असल्यानेच शेतकरी संतप्त - सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:08 AM2021-08-29T04:08:04+5:302021-08-29T04:08:04+5:30
मुंबई : यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत टोमॅटोची लागवड केली. आता बाजारात टोमॅटोची आवक ...
मुंबई : यंदा जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत टोमॅटोची लागवड केली. आता बाजारात टोमॅटोची आवक जास्त झाली आहे, पण त्या तुलनेत मागणी घटल्याने टोमॅटोच्या किमती उतरल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एरवी एका क्रेटमागे ६० ते ७० रुपये भाव शेतकऱ्याला मिळतो; मात्र मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या एका क्रेटला १० ते १५ रुपये भाव मिळणेदेखील अवघड झाले आहे.
दिवस-रात्र मेहनत करून व लाखो रुपये खर्च करून पिकवलेले टोमॅटो शेतकरी हतबल होऊन रस्त्यावर फेकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मुंबईत किरकोळ बाजारांमध्ये एरवी २५ ते ३० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता ८ ते १० रुपये किलोने मिळत आहेत. टोमॅटो स्वस्त झाले असले तरीदेखील शेतकऱ्यांना हवा तेवढा मोबदला मिळत नसल्याचे दुःख मुंबईकरांना जाणवत आहे.
संचिता पवार (गृहिणी) - मागच्या काही दिवसांमध्ये भाज्यांचे दर वाढले आहेत. मात्र आता टोमॅटोचे दर कमी झाल्यामुळे जेवणात जास्तीत जास्त टोमॅटोचा वापर केला जात आहे. टोमॅटो स्वस्त झाले असले तरीदेखील शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा.
हेमांगी धावरे (गृहिणी) - आधीच अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्याला त्याच्या पिकांचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे, अन्यथा पुढच्या काळात टोमॅटोची लागवड अत्यंत कमी केली जाईल व पुन्हा एकदा टोमॅटोचे दर गगनाला भिडतील.
प्रकाश पांडे (व्यापारी) - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. टोमॅटोला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्याचा लागवड, मजुरी व प्रवास खर्च देखील निघत नाही. यासाठी टोमॅटोची आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये निर्यात वाढविण्यावर सरकारने भर द्यायला हवा.