Join us

...तर उद्या उद्योगपतीही देशाचे पंतप्रधान होतील; शिंदेंच्या बंडाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 1:01 PM

निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजेच राजकीय पक्ष असं असेल तर उद्या उद्योगपती आणि धनाड्य लोकही पंतप्रधान होतील, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई-

निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजेच राजकीय पक्ष असं असेल तर उद्या उद्योगपती आणि धनाड्य लोकही पंतप्रधान होतील, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे-शिंदे गटाच्या वादाच्या मुद्द्यावर होणाऱ्या सुनावणीबाबत आज उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानतच नाही. कारण पक्षातून फुटून गेलेले लोक पक्षावर दावा ठोकू शकत नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

"शिवसेना पक्षावर दावा ठोकणाऱ्यांनी आमच्याकडे आमदार, खासदार जास्त आहेत असं म्हटलं आहे. पण केवळ लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय पक्ष नसतो. रस्त्यावरचा खरा पक्ष असतो. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या उद्योगपतीही पंतप्रधान होतील. बंडखोरांच्या नेत्याला मुख्य नेता हे पद दिलं गेलं आहे. पण पक्षाच्या घटनेत मुख्य नेता हे पदच नाही. शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतं. त्यांच्या पश्चात ते पद आम्ही गोठवलं आणि शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण केलं. तशी पक्षाच्या घटनेतही नोंद केली गेली. पक्षप्रमुख पदाचं काम मी गेली काही वर्ष पाहत आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...हे तर हास्यास्पद"निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजे जर पक्ष असेल तर हे हास्यास्पद आहे. असं असेल तर याचा निकाल देण्यासाठी निवडणूक आयोगानं थांबण्याची गरजच नव्हती. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आता १६ सदस्य अपात्र ठरणार असतील तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोग निर्णय कसं काय देऊ शकतं? त्यामुळे सर्वात आधी १६ जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा अशी आमची मागणी आहे. कायदे तज्त्रांच्या मते त्या १६ सदस्यांच्या अपात्रेची शक्यताच जास्त आहे. बंडखोर सदस्य अपात्र ठरले मग विषयच निकाली निघतो. निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना